नागपूर – सी-20 परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणाचे संतुलन राखून विकास’ (बॅलन्सिंग डेव्हलपमेंट विथ एनव्हायर्नमेंट) या विषयावरील परिसंवादात पर्यावरणस्नेही जीवनशैली, आरोग्य-पर्यावरण परस्परसंबंध, हवामान प्रतिरोधक्षमता, संतुलित विकास, विकेंद्रीत जलसंधारण, वनसंरक्षण, नद्यांचे संवर्धन आदी विषयांवर व्यापक विचारमंथन झाले. जी-20 समुहातील राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी शाश्वत विकास प्रक्रियेचा विविध दृष्टीकोनातून वेध घेतला.
सी-20 परिषदेत आज पहिल्या दिवशी झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय माहिती आयुक्त सत्यानंद मिश्रा होते. क्लिंटन हेल्थ ऍक्सेस इनिशियेटिव्हच्या डॉ. अँडी कार्मोन, नेदरलँडच्या पर्यावरण तंत्रज्ञानाच्या अभ्यासक डॉ. मेर्ले डे क्रुक, आसामचे पर्यावरणतज्ञ जादव पायेंग आणि पीपल्स वर्ल्ड कमिशन ऑन फ्लड अँड ड्रॉट या संस्थेच्या आयुक्त इंदिरा खुराना यांचा प्रमुख वक्त्यांमध्ये समावेश होता.
या सत्रामध्ये एकात्मिक समग्र आरोग्य, मन, शरीर आणि पर्यावरण, शाश्वत आणि प्रतिरोधक्षम समुह, हवामान, पर्यावरण, निव्वळ शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट, पर्यावरणासाठी योग्य जीवनशैली, नद्यांचे पुनरुज्जीवन आणि जलव्यवस्थापन या विषयावरील कार्यगटांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रिया नायर, अमृता विश्वविद्यापीठमच्या डॉ. मनीषा सुधीर, योजक केंद्राचे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे, सत्संग फाउंडेशनच्या राष्ट्रीय समन्वयक वासुकी कल्याणसुंदरम, यांचा समावेश होता.
मानवजात ही त्यांच्या सभोवतालचा परिसर आणि निसर्ग यावर अवलंबून आहे, ही सर्व कार्यगटांच्या विषयांमध्ये एक सामाईक संकल्पना आहे. हीच भावना माता अमृतानंदमयी आपल्या विचारांमधून व्यक्त करत आहेत, असे गौरवोद्गार आपल्या अध्यक्षीय भाषणात सत्यानंद मिश्रा यांनी काढले. एकात्मिक समग्र आरोग्य म्हणजेच समावेशक आरोग्य ही संकल्पना विस्ताराने समजावून सांगताना आरोग्य आणि पर्यावरण यात परस्परसंबंध आहे, असे डॉ. प्रिया नायर यांनी स्पष्ट केले. समग्र आरोग्याविषयी सुरू असलेल्या उपक्रमांशी संबंधित सर्वोत्तम उदाहरणांचा विचार आपल्या कार्यगटाने केला असून त्याबाबत त्यांनी माहिती दिली. मानसिक आरोग्य, पोषणावर भर, ज्येष्ठांचे आरोग्य आणि जीवनाची काळजी घेणारे समग्र आरोग्य, बिगर संसर्गजन्य आजार, महिला आणि बालकांचे आरोग्य हे समग्र आरोग्याचे एकात्मिक घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती मनीषा सुधीर यांनी आपल्या भाषणात हवामान प्रतिरोधक्षमता आणि सामाजिक न्याय, पर्यावरणीय शाश्वतता, शून्य उत्सर्जन उद्दिष्टाचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या चार उपकल्पनांवर भर दिला. जीवनशैली आणि विकासाचा परस्परसंबंध आहे असे गजानन डांगे यांनी सांगितले. मूल्याधारित चौकटीसोबत लक्ष्याधारित चौकटीची भर घातली पाहिजे, मूल्याधारित दृष्टीकोनाची चौकट ही पर्यावरण केंद्रित जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विकासाची भारतीय पद्धत आपण जगामध्ये पुढे घेऊन जाऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
श्रीमती वासुकी कल्याणसुंदरम यांनी नद्यांच्या संवर्धनाचे महत्त्व विशद केले. नद्यांची पाणीपातळी खालावणे आणि जलस्रोतांचे प्रदूषण ही चिंतेची बाब असल्याचे सांगून त्यांनी जल व्यवस्थापनातील पाच आरच्या भूमिकांवर प्रकाश टाकला. ते पाच ‘आर’ म्हणजे रिड्यूस, रियुज, रिचार्ज, रिसायकल आणि रिस्पेक्ट अर्थात कमीत कमी वापर, पुनर्वापर, पुनर्भरण, पुनर्चक्रीकरण आणि आदर. जगभरातील भारत आणि न्युझीलंडसारखी सरकारे नद्यांना सजीव म्हणून मान्यता देत आहेत हे एक सकारात्मक लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्यावर चर्चा करताना दोन संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. समानता, लिंगभाव एकात्मता आणि एकात्मिक समग्र आरोग्य. दुर्गम भागात राहणाऱ्या आणि उपेक्षित समाजातील लोकांच्या आरोग्याच्या समस्यांकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे यावर डॉ. अँडी कार्मोन यांनी भर दिला. डॉ. मेर्ले डी क्र्यूक यांनी जलचक्राचे महत्त्व सांगितले. मानवाने जलचक्र तोडल्याची खंत व्यक्त करून त्या म्हणाल्या, शास्त्रज्ञ आणि संशोधक म्हणून आम्ही ते सुधारण्याचे मार्ग शोधत आहोत, परंतु आम्हाला ते पुनर्स्थित करणे आवश्यक आहे. हवामान बदलाची समस्या लक्षात घेऊन त्याचे दुष्परिणाम कमी करणे गरजेचे असून जलचक्र पुन:स्थापित करण्याची आमच्याकडे ही एकमेव संधी आहे.
इंदिरा खुराणा यांनी हवामान बदल, दुष्काळ आणि पूर या विषयावर बोलताना वर्षा जलसंधारणाचे महत्व तसेच विकेंद्रित जलसंधारणाच्या दृष्टिकोनाबद्दल सांगितले. या संकल्पनेत स्थानिक कौशल्य आणि पीक लागवडीकडे पर्यावरणशास्त्र आणि पर्जन्यमानाबरोबरच एक आवश्यक बाब म्हणून पाहिले जाते. त्यांनी समुदायाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही तर पाणी आणि जलसंवर्धनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. हवामानाच्या कोणत्याही चर्चेत पाणी हा महत्वाचा मुद्दा असला पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
जादव पायेंग यांनी वनसंरक्षणातील त्यांच्या कार्याबद्दल सांगतांना वृक्षलागवड आणि त्याचे संगोपन करण्याच्या भूमिकेवर भर दिला. आपण तयार केलेल्या जंगलांमुळे जैववैविध्य निर्माण झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.