नागपूर : केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती आहे. गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात मंगळवारी सकाळी धमक्या देणारे दोन फोन आल्यामुळे खळबळ माजली असून पोलिसांनी धमक्या देणाऱ्या फोन कॉल्सचा शोध सुरु केलाय. धमकी देणाऱ्याने आपले नाव जयेश पुजारी असे सांगितलं आहे. (Threatening call to Nitin Gadkari again) मंगळवारी सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे धमकीचे कॉल आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. या कॉलप्रकरणी त्यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले. धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत. या धमक्यातर नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. धमकी देणाऱ्या जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला तरी धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण आणि त्याने कुठून कॉल केले, हे अजून स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील गडकरी यांच्या कार्यालयात धमकी देणारे कॉल आले होते. नंतर ते कॉल कर्नाटकातील बेळगाव तुरुंगातून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. आज पुन्हा त्याच गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे दोन कॉल केल्याने पोलिस यंत्रणा देखील चक्रावून गेलीय.