चंद्रपूर वीज केंद्रातील महिलांचे लैगिक शोषण!

0

आमदार सुधाकर अडबालेंचा विधान परिषदेत दावा : उपसभापती नीलम गोऱ्हेंचे अहवाल सादर करण्याचे निर्देश

चंद्रपूर. वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहणारे चंद्रपूरचे वीज केंद्र (Chandrapur Power Station ) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चंद्रपूरच्या वीज केंद्रातील विजय एंटरप्रायझेस कंपनीच्या पर्यवेक्षकाने प्लांटमध्येच ६ महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानपरिषदेत (Legislative Council ) उमटले. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले (Teacher MLA Sudhakar Adbale) यांनी हा गंभीर मुद्दा विधान परिषदेत मांडला. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्याला दीड महिना लोटूनही पोलिसांनी गुन्हाच दाखल केला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पिठासीन सभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या दाव्याची तत्काळ दखल घेतली. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. विधानपरिषदेतील चर्चा आणि सभापतींनी दिलेल्या निर्देशाबाबतची माहिती येऊन धडकताच वीज केंद्रात एकच खळबळ उडाली आहे.
पीडित महिलांच्या तक्रारीनुसार, विजय एंटरप्रायझेस ही चंद्रापूर विज केंद्रातील कंत्राटी कंपनी आहे. मुरारी समुद्रवार हा या कंपनीचा पर्यवेक्षेक म्हणून कामावर आहे. गेल्या ५ फेब्रुवारी २०२३ रोजी, चंद्रपूर वीज केंद्रात काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचार्‍यांसोबत त्याने अभद्र वर्तणूक केली. त्याने प्लांटमध्येच ६ महिला कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण केले. त्याने महिला सफाई कर्मचाऱ्यांना सोबत झोपन्यास सांगितले. वेश्या असल्याच्या गंभीर आरोपासोबतच जातीवाचक गलिच्छ शिव्या दिल्या. त्याच्या या कृत्याने दुखावलेल्या पीडित महिलांनी तक्रार देण्यासाठी दुर्गापूर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानी रितसर लेखी तक्रारही दिली, मात्र दीड महिना उलटूनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. याप्रकाराची माहिती शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुद्दा सभागृहात मांडला. प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर उपसभापती नीलम गोरे यांनी पोलिसांना कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा