सीनेट निवडणूक : मतमोजणी सुरू

0

कमी मतदानामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक

नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) सीनेटमधील पदविधर प्रवर्गातील १० जागांसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. मंगळवारी सकाळी १० वाजतापासून विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला (counting of votes started in the auditorium of Jamnalal Bajaj Administration Building). प्रारंभी चारही जिल्ह्यांतील मतपेट्या एकत्र करून मतपत्रिकांची जुळवणी सुरू करण्यात आली. वृत्त लिहेपर्यंत हेच काम सुरू होते. यामुळे कल नेमका कुणाच्या बाजुने तेसुद्धा स्पष्ट होऊ शकले नाही. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता सर्व निकालांची स्पष्टता होण्यासाठी उद्या दुपारपर्यंत वाट बघावी लागू शकते, असे विद्यापीठातील जाणकारांचे म्हणणे आहे. यावेळी केवळ २२ टक्केच मतदान झाले यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या मनातील घालमेल स्पष्टपणे चेहऱ्यावर जाणवते आहे.

सिनेट पदवीधर प्रवर्गातील १० जागांसाठी तब्बल ११ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदार यादीतील घोळाचा फटका मतदारांना बसला असून केवळ २२.९७ टक्के मतदान झाले. मतदानाची ही टक्केवारी गेल्यावेळीच्या निवडणुकीच्या तुलनेत निम्मीच आहे. २०१८ मधील पदवीधर प्रवर्गाच्या निवडणुकीमध्ये ४१ टक्के मतदान झाले होते. सिनेटच्या पदवीधरातील दहा जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी ६० हजार ३७६ मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तिपटीने मतदारांची संख्या वाढल्याचे दिसून आले. निवडणुकीसाठी एकूण १०२ केंद्रे तयार करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक ३५ केंद्र शहरात तर नागपूर जिल्ह्यात २२ केंद्र तयार करण्यात आली होती. हजारो मतदारांचे केंद्र बदलून जिल्ह्यापार गेल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यामध्ये प्रामुख्याने नागपूरच्या मतदाराचे केंद्र गोंदिया, भंडारा, गोंदिया आणि नागपूर ग्रामीण परिसरात असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. परिणामी मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसून आले. यातही सर्वाधिक मतदान वर्धा जिल्ह्यात २६.११ टक्के झाले. नागपूरशहरात २३.१४ तर ग्रामीण भागात २५.६५ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. कमी मतदानाचा फटका कुणाला ते निकालातूनच स्पष्ट होऊ शकणार आहे.

मतदानाची टक्केवारी

जिल्हा – मतदान केंद्र – टक्केवारी
नागपूर शहर – ३५ – २३.१४
नागपूर ग्रामीण – २२ – २५.६५
भंडारा – २१ – २०.५१
गोंदिया – ११ -२१.५३
वर्धा – १३ – २६.११