मुंबईः राज्याचे मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse warned Sanjay Raut) यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी घोटाळ्याचे आरोप करणारे ट्वीट केले आहे. या आरोपांवर संतप्त झालेल्या भुसे यांनी राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. भुसे म्हणाले की, त्या चौकशीत मी दोषी आढळलो, तर आमदारकी आणि मंत्रीपदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईन. जर यात खोटे आढळून आले, तर या महागद्दारांनी राज्यसभेच्या खासदारीकाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान भुसे यांनी संजय राऊतांना दिले आहे. संजय राऊत हे भाकरी ‘मातोश्री’ची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात. संजय राऊतांनी मालेगावच्या नागरिकांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी. २६ मार्चपर्यंत माफी मागितली नाही, तर त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भुसेंनी दिला. त्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून भुसेंवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. भुसे यांनी गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण, कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल, असा दावा राऊतांनी केला. त्यांनी ईडी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ट्विटमध्ये टॅग केले आहे. त्यावर आज विधानसभेत बोलताना दादा भुसे यांनी संजय राऊतांवर पलटवार करून त्यांना आव्हान दिले. आम्हाला वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर राज्यसभेवर निवडून गेलेल्या संजय राऊतांनी काल एक ट्वीट केले. जगाच्या पाठीवर असलेल्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या ट्वीटची चौकशी करण्यात यावी, असे भुसे म्हणाले.