नागपूर-नागपूर जिल्ह्यातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन त्यात ९ कामगारांच्या मृत्यूप्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. कामकाज बाजुला सारुन या मुद्यावर चर्चेची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी, या घटनेवर सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. चर्चेची मागणी फेटाळून लावत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मुद्यावर निवेदन करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. दरम्यान, विरोधकांनी या मुद्यावर आक्रमक होत विधानसभेत सभात्याग केला.
विधानसभेत कामकाज सुरु झाल्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सोलर एक्स्प्लोसिव्हमधील घटना अतिशय गंभीर असून त्यावर सभागृहात चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. कंपनीत कंत्राटदारांकडून पाठविलेल्या अकुशल कामगारांना स्फोटके हाताळावी लागतात, असा आरोप त्यांनी केला. या कामगारांना अतिशय तुटपुंजे वेतन दिले जाते, असेही त्यांनी सांगितले. सरकारने या घटनेची जबाबदारी म्हणून कामगारांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. आमदार नाना पटोले यांनीही हा मुद्दा उपस्थित करुन चर्चेची मागणी केली. दरम्यान, सरकारने या मुद्यावर सोमवारी कामकाज संपण्यापूर्वी निवेदन करावे, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत. दरम्यान, याने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणबाजी करीत विधानसभेत सभात्याग केला.















