मुंबईः अवकाळी पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर आज विधानसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका (Opposition Walkout from Legislative Assembly) घेतली. कामकाज थांबवून या मुद्यावर चर्चा घेण्याचा विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान, आम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली नाही तर आम्ही १२ हजार कोटी रुपयांची मदत केली. तुम्ही ५० हजार कोटी रुपये देतो म्हणाले, पण दिले नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आज विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरही जोरदार घोषणाबाजी केली.
अवकाळी पाऊस, नुकसानग्रस्त शेतकरी आणि नाफेडच्या खरेदीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारवर टीका केली. कृषिमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकरी आत्महत्या सुरू असून सरकार हा प्रश्न अद्यापही गांभीर्याने घेतला नसल्याचा आरोप त्यांनी केला. आज अधिवेशनात केवळ अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी करत विधानसभेत विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व ठाकरे गटाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सभात्याग केला.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देखील विरोधकांनी आंदोलन केले. अवकाळीग्रस्त शेतऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहीजे, बळीराजाला तातडीने मदत करा, अन्यथा खुर्च्या सोडा, अशा घोषणा विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दिल्या. या आंदोलनात विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, रोहित पवार यांच्यासह काँग्रेस व शिवसेनेचे आमदार सहभागी झाले होते. राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने विकासकामांना स्थगिती दिली, याचाही निषेध करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या.