
मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ( Leader of Opposition Ambadas Danve) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी मराठवाड्यात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्यात दानवे यांचे नाव पुढे येत असून या घोटाळ्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाकडून मागविण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष राठोड (Main Accused Santosh Rathod) याच्याकडे सापडलेल्या डायऱ्यांमध्ये अंबादास दानवे यांच्या नावाचा उल्लेख असून आगामी काळात दानवे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दानवे यांनी घोटाळ्याचा इन्कार केला आहे. डायऱ्यांमध्ये आपले नाव नसून ते कुठले दुसरे दानवे असतील, असा दावा त्यांनी केलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात पोलिसांनी जप्त केलेल्या डायरीत असलेल्या गुंतवणूकदारांच्या नावाची यादी असून त्यात तत्कालीन मंत्र्यांपासून, पोलिस अधिकारी, शिक्षक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे नावांसह व पदासह डायरीत उल्लेख आहे. त्यामुळे ईडीने या प्रकरणी चौकशी सुरु केल्यास दानवे यांच्या अडचणी वाढू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. दानवे हे सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यावर पक्षाने त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी सोपविली होती. मराठवाड्यात गाजलेल्या या घोटाळ्यात असंख्य शेतकऱ्यांना गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून फसविण्यात आल्याचा प्रकार घडला होता.