लाजेपोटी, भीतीपोटी ठाकरेंनी खुर्ची सोडली

0

फडणवीस यांचा पलटवार

 (Mumbai)मुंबईः  “आपण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. त्यांना आपला सवाल आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसताना त्यांनी ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करून ठेवली होती? नैतिकतेबद्धल त्यांनी बोलूच नये. त्यांनी खुर्चीसाठी विचार सोडला. एकनाथ शिंदे यांनी विचारांसाठी खुर्ची सोडली. आपल्याकडे बहुमत नाही, हे लक्षात आल्यावर (Uddhav Thackery ) उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यांनी लाजेपोटी व भीतीपोटी खुर्ची सोडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विनाकारण नैतिकतेचा मुलामा चढविण्याचा प्रयत्न करु नये…” या शब्दात उपमुख्यमंत्री (DCM devendra Fadnvis) देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस आणि (CM Eknath Shinde )मुख्यमंत्री शिंदे यांनी बाजू मांडली. फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्य होता, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आधी काही लोकांना शंका होती, त्याचे समाधान न्यायालयाने केले असावे. अर्थात, ते सर्वोच्च न्यायालयाला मानत असतील तर त्यांच्या शंकेचं समाधान झालं असेल, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, अध्यक्ष आणि आयोगाला त्यांच्यासमोर येणाऱ्या मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे, हेही न्यायालयानं स्पष्ट केले आहे. अपात्रतेच्या याचिकांबाबतचा सर्व अधिकार अध्यक्षांचा आहे. त्यामुळे अध्यक्ष अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले…

दरम्यान, सरकार तर सेटल झाले आहे. आता काय डाऊट नाही ना तुम्हाला? कारण काही लोक हरल्याबद्दल फटाके फोडायला लागले आहेत, असा टोला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला.