गडचिरोली. गोंडवाना विद्यापीठातर्फे (Gondwana University ) बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी (ball badminton competition) चेन्नईला (Chennai ) गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन (Misbehavior with female players ) केल्याचा धक्कादायक व तेवढाच संतापजणक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी प्रकुलगुरु डॉ. कावळे यांचेकडे तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली आहे. गंभीर बाब म्हणजे भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांसोबरत राष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारचे गैरवर्तन झाल्याप्रकरणी देशभरात गदारोळ माजला होता. आता गोंडवाना विद्यापीठातील महिला खेळाडूंसोबतही असला प्रकार घडल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. गोंडवाना विद्यापीठाकडून 25 जानेवारी रोजी चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी दहा विद्यार्थीनींची चमू पाठविण्यात आली होती. त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून राजेश हजारे व व्यवस्थापक विजय सोनकुवर हे होते. मात्र, या दोघांनी चेन्नईत गेल्यापासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन सुरू केले.
हजारे, सोनकुवर यांच्यावर ऐवढाच ठपका नाही तर अमरावती व मुंबई विद्यापीठातील मुलींसोबत देखील ‘चार्जर’ मागण्याच्या बहाण्याने खोलीत जाऊन गैरवर्तन केल्याचा आरोपही आहे. पूर्ण वेळ हे दोघेही दारूच्या नशेत असायचे. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. स्पर्धा संपवून परत आलेल्या मुलींनी सोमवारी तत्काळ प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे. हे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक सदर खेळाडूंवर तक्रार केल्यास बघून घेण्याची धमकी देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महिला सहकारी सोबत का नव्हते?
महिला खेळाडूंसह महिला कर्मचारी तैनात करणे आवश्यक होते. मात्र, क्रीडा विभागाच्या संचालक डॉ अनिता लोखंडे या स्वतः महिला असतानासुद्धा त्यांनी याकडे कशी काय डोळेझाक केली. यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशिक्षक सोनकुवर यांच्यावर खेळाडूंच्या चमुसोबत जाण्यास दोन वर्षांपासून बंदी असल्याचीही माहिती समोर येत आहे. यानंतरही त्यांना मुलींसोबत पाठविण्यात आले. तक्रार करण्यासाठी विद्यापीठात आलेल्या मुलींसोबत विजय सोनकुवर यांनी पुन्हा गैरवर्तणूक करीत बघून घेण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे दोषी प्रशिक्षक व व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.