साओ पाउलो: फुटबॉलमधील सर्वकालीन महान खेळाडू, फुटबॉलचे जादूगर पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप मिळवून देणारे महान फुटबॉलपटू पेले हे गेले काही दिवस साओ पाउलोच्या रुग्णालयात कर्करोगाशी सामना करीत होते. जगप्रसिद्ध पेले हे त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘किंग’ पेले किंवा ‘ब्लॅक पर्ल’ या टोपणनावाने ओळखले जायचे. (Football legend Pele dies at 82) पेले यांनी १,३६३ सामान्यांत १,२८१ गोल करण्याची कामगिरी बजावली आहे. पेले यांचे संपूर्ण नाव एड्सन आरेंटीस डू नाशसिमेंटू. ब्राझीलमधील ट्रेस कुरसँइस येथील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म.
लहानपणापासूनच त्याला फुटबॉलची आवड होती. फुटबॉलमधील अद्वितीय कामगिरीनंतर वयाच्या ३७ व्या वर्षी पेलेंनी खेळातून निवृत्ती घेतली. त्याच्या काळात ते फुटबॉलमधील इनसाइड फॉरवर्ड खेळणारे सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जायचे. अप्रतिम कौशल्य, कमालीचे चापल्य, आक्रमकता, अचूक अंदाज आणि शारीरिक सुदृढता याच्या बळावर पेलेची कारकीर्द बहरली. गोल करण्याची त्याची क्षमता अद्वितीय होती. १९६० ते १९७० या दशकातील ते सर्वांत लोकप्रिय खेळाडू ठरले. अमेरिकेत त्यांनी फुटबॉलचा खेळ लोकप्रिय केला व त्या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.