पंतप्रधान मोदी उद्या पुन्हा मुंबईत, विकास प्रकल्पांचे उद्धाटन करणार

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शुक्रवारी मुंबईत येत (PM Narendra Modi on Mumbai Visit) असून मोदी यांचा महिनाभरातील हा दुसरा मुंबई दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे मुंबईतील विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. आगामी काही महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. कसेही करून ही महापालिका जिंकण्याची तयारी भाजपने केली असून त्यासाठी मुंबईत वेगवेगळ्या विकास प्रकल्पांना चालना देण्यात येत आहे. मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांशिवाय ते वंदे भारत ट्रेनच्या दोन मार्गांना हिरवी झेंडी दाखवणार आहेत. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी दोन वंदे भारत ट्रेन सुरू होत आहेत.

मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेन शुक्रवारपासून नागरिकांच्या सेवेत येणार आहेत. मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर तसंच आळंदी या तीर्थक्षेत्राच्या पर्यटनाला चालना मिळेल, तसंच मुंबई-शिर्डी वंदे भारतमुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनी शिंगणापूर सारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्र रेल्वे संपर्कात येतील. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून यामुळे मुंबईतील वाहतुकीची कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे. पंतप्रधान मोदी मुंबईत बोहरा समुदायाच्या अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नव्या परिसराचेही उद्घाटन देखील करणार आहेत. ही संस्था बोहरा समुदायाच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करते आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात विकासकामांचे लोकार्पण होणार असले तरी या दौऱ्याकडे राजकीय नजरेतून देखील पाहिले जात आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा