सापळा रचून केली अटक
नागपूर. भंडारा व नागपूर वनविभागाच्या पथकाने (Bhandara and Nagpur Forest Department teams ) दुर्मिळ प्रजातीच्या खवल्या मांजरीची तस्करी (Trafficking of pangolin) करणाऱ्या दोघांना अटक (Two were arrested) केली आहे. आरोपींकडून 19.15 कि.ग्रॅ. वजनाचे जिवंत नर खवले मांजर जप्त केले. रामेश्वर माणिक मेश्राम (32) रा. तिड्डी, जि. भंडारा तसेच सचिन श्रावण उके ( 29)रा. खमारी (भोसा) जि. भंडारा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तस्करीच्या उद्देशाने भारतात खवल्या मांजराची शिकार वाढल्याचे दिसत आहे. ओडिशामध्येही या प्राण्याच्या तस्करीत वाढ झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात चिनी पँगोलिनची संख्या घटल्याने तस्करांचा मोर्चा भारताकडे वळला आहे. वन विभागाच्या पथकाला खवल्या मांजराची विक्री करण्यात येत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यावर पथकाने बनावट ग्राहक पाठवून सौदा केला. सौदा पक्का झाल्यावर आरोपींना अटक केली.
नागपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी (दक्षता) प्रितमसिंह कोडापे यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, विवेक राजूरकर, आय. एम. सय्यद, क्षेत्र सहायक एन. डी. तवले, वनरक्षक संदीप धुर्वे, दिनेश शेंडे, योगेश ताळाम, दिनेश पवार, ए. एन. नरडंगे, एन. जी. श्रीरामे, एस. एस. कुकडे आदींचा समावेश होता.
पैशासाठी तस्करांची क्रूरता
प्रथम रानावनात खवल्या मांजरांची बिळे शोधतात. त्यानंतर पद्धतशीरपणे खवले मांजर बाहेर काढतात. खवले काढण्यासाठी या मांजराला उकळत्या पाण्यात टाकले जाते. हे काम करणारे रॅकेटच कार्यरत असल्याची चर्चा आहे. आरोपींच्या चौकशीतून तस्करांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
महाराजबागेत नवीन पाहुणे
नागपूर. महाराजबाग प्राणिसंग्रहालयात बुधवारी सकाळी बिलासपूर येथील कानन पेंढारी झूलॉजिकल गार्डनमधून हॉग डिअर व दोन लांडोर आले आहेत. महाराजबागेत नर मोर होते. जोडी बनविण्याकरिता दोन माद्या आणल्या आहेत. महाराज बाग प्राणी संग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ सुनील बावस्कर यांच्या निर्देशनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोटघरे, पशुधन पर्यवेक्षक महेश पांडे तसेच प्राणीपाल हरीलाल तिरमले, सिद्धनाथ चौधरी व रामजीत यादव हे या प्रक्रियेत सहभागी होते. तसेच कानन पेंडारी येथील अजय यादव व राकेश यादव यांनी यासाठी प्राणी संग्रहालयास मदत केली.