रेल्वे इंजिनांच्या नागपुरातील अत्याधुनिक देखभाल व दुरुस्ती डेपोचे उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

0

नागपूरः भारतीय रेल्वे व एलस्टॉर्मचा नागपुरातील अजनी परिसरातील रेल्वेइंजिन देखभाल व दुरुस्ती डेपो लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवारी या डेपोचे लोकार्पण होणार आहे. १२ हजार हॉर्स पॉवरच्या रेल्वे इंजिनांची निर्मिती भारतीय रेल्वे व एलस्टॉर्मची संयुक्त उपक्रम कंपनी असलेल्या एमईपीएलकडून बिहारच्या मधेपुरा येथे केली जाते. मात्र, या इंजिनांची देखभाल व दुरुस्ती उत्तर प्रदेशातील सहारणपूर आणि महाराष्ट्रात नागपूर अशा दोन ठिकाणांवर होणार आहे. यापैकीी सहारणपूर येथील डेपो यापूर्वीच सुरु झाला असून नागपुरातील देखभाल दुरुस्ती डेपो देखील लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. नागपुरातील डेपोमध्ये भविष्यात २५० रेल्वे इंजिनांची देखभाल दुरुस्ती केली जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.


२०२० मध्ये या डेपोच्या निर्मितीचे काम सुरु झाले. मात्र, कोव्हीडकाळात हे काम फारसे पुढे जाऊ शकले नव्हते. आता अत्यंत आधुनिक यंत्रसामुग्रीसह हा डेपो लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. सध्या सहारणपूर येथील डेपोकडून १७७ इंजिनांची देखभाल दुरुस्ती सुरु आहे. येत्या काळात नागपुरातील डेपो सुरु झाल्यावर दोन्ही डेपोंमध्ये प्रत्येकी अडीचशे रेल्वे इंजिनांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय रेल्वेसाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. २०१५ मध्ये एलस्टॉर्म या कंपनीला भारतीय रेल्वेसाठी १२ हजार हॉर्सपॉवरचे ८०० इंजिनांच्या निर्मितीचे कंत्राट मिळाले होेते.