नागपूर : बागेश्वर धामचे पिठाधिश धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेशवर सरकार यांनीच नागपुरात येऊन भक्तांसमोर नव्हे तर पत्रकार भवनात आपले दावे पूर्ण करावेत असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा श्याम मानव यांनी दिले आहे. बागेश्वर सरकार यांचे समर्थक, विहिप, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटना नागपुरात शुक्रवारी रस्त्यावर उतरल्या. संविधान चौक येथे झालेल्या आंदोलनात अंनिसचे प्रा श्याम मानव यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने वातावरण तापले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा पुतळा ताब्यात घेतला. बराच वेळ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची ‘जय श्रीराम’ हिंदुओके सन्मान मे..सनातनी मैदानमे अशी घोषणाबाजी सुरूच होती केवळ हिंदू धर्मियांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान असून हिंदू धर्मीय हे कदापि सहन करणार नाही असा इशारा या निमित्ताने देण्यात आला. नागपुरातील कार्यक्रमाचे आयोजक आमदार मोहन मते यांनी अंनिसने इतर धर्मीयांबाबत असा भांडाफोड करावा, आपण माहिती देण्यास तयार आहोत अशी भूमिका जाहीर केली. यानंतर आता प्रा मानव यांनी आपल्याला सनातन धर्म शिकवू नये, मी मा गो वैद्य यांना गुरू मानले म्हणून माझा संघाशी संबंध जोडला जाऊ शकत नाही. भविष्याचा वेध घेण्याची शक्ती त्यांच्यात असेल तर ती दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी, सीमा रक्षण, देशहितासाठी वापरता येईल असे आव्हान दिले. नुकतेच प्रा श्याम मानव यांचे बागेशवर महाराज उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात व्याख्यान झाले. यावेळी देखील दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली. 30 लाख रुपयांचे अनिसचे आव्हान न स्वीकारताच बागेश्वर सरकार यांनी नागपुरातून फळ काढला असा आरोप अनिसने केला होता मात्र अनिसच्या लोकांनी रायपूरला यावे, आम्हाला तीस लाख नको आपण त्यांचे पूर्णतः समाधान करू असे प्रति आव्हान धीरेंद्र कृष्ण उर्फ बागेश्वर सरकार यांनी अनिसला दिले होते. गेले दोन-तीन दिवस या दावे-प्रतिदाव्यानी नागपुरात वातावरण तापले आहे.