क्रिकेटपटू उमेश यादवला मॅनेजरचा 44 लाख रुपयांनी गंडा

0

नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादवला त्याच्याच मॅनेजरने 44 लाख रुपयांनी गंडा घातला आहे. कोराडी पोलिसात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता शैलेश ठाकरे नामक त्या मॅनेजरचा शोध घेत आहेत. एक भूखंड खरेदीसाठी कोराडी रोडवरील स्टेट बँकेत ही रक्कम ठेवली होती. मॅनेजर ठाकरेने त्या 44 लाख रुपयातून उमेश यादवसाठी प्रॉपर्टी तर खरेदीच केली नाही. उलट ठाकरे याने बँक खात्यातून परस्पर पैसे काढून स्वतःच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली. नंतर उमेश यादवला पैसेही परत देण्यास टाळाटाळ केली. अखेरीस आपला मॅनेजर शैलेश ठाकरेंने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर उमेश यादवने पोलिसांत धाव घेतली.
उमेश यादवने कोराडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शैलेश ठाकरेविरुद्ध भादंवि कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भारतीय संघातील जलदगती गोलंदाज उमेश यादव क्रिकेटच्या निमित्ताने सतत बाहेर रहात असल्याने बँकिंगसह ऑफिसची सर्व कामे करण्याचा अधिकार या मॅनेजरला होता.