नाशिक : संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0

 

 

नाशिक, १४ मे : सरकारच्या विरोधात चिथावणीखोर बोलणे तसेच पोलिसांची प्रतिमा समाजामध्ये खराब करणे या कारणामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यमान राज्य सरकार बेकायदेशीर असून आगामी तीन महिन्यात हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर सरकारच्या आदेशाचे पालन करु नका. बेकायदेशीर आदेशाचे पालन केले तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, असे आवाहन करणे ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण याच विधानावरून त्यांच्याविरोधात येथील मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी खा. राऊत नाशिक दौऱ्यावर होते. शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहेत. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करु नये, असा आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सरकारबद्दल अप्रिय बोलल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात भादंवि 505 (1 )(ब) कलमा अंतर्गत पोलीसांन विषयी अप्रतिची भावना निर्माण करणे, चिथावणी देणे या अंतर्गत पोलीस हवालदार केदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.