राहुल गांधींना १३ एप्रिलपर्यंत जामीन मंजूर

0

सुरत : मोदी आडनावावरून मानहानीच्या प्रकरणात सुरत सत्र न्यायालयाने सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राहुल यांच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत हा जामीन लागू राहील. पुढील सुनावणीला राहुल यांच्या उपस्थितीतीची गरज नाही. कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर मात्र अजून कोणताही निर्णय झाला नाही. या प्रकरणी कोर्टाने तक्रारदार पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावली आहे. त्यावर 10 एप्रिलपर्यंत त्यांना शपथपत्र दाखल करायचे आहे. आज राहुल गांधी हे बहीण प्रियंकासह सुरतमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील नेत्यांची उपस्थिती होती. न्यायालयात राहुल गांधी यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यापैकी एक याचिका जामीन मिळण्याबाबत होती तर दुसरी याचिका शिक्षेला आव्हान देणारी होती. राहुल गांधी यांना जामीन मिळाला आहे मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती अद्याप मिळालेली नाही.
राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील बेल्लारी येथे २०१९ च्या निवडणूक प्रचारात सगळे मोदी आडनावाचे लोक चोर असतात, असे वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी त्यांना सुरतच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची सुनावली होती. यानंतर त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावल्यानंतर ३० दिवसांची मुदत दिली होती. त्या तीस दिवसांच्या आत राहुल गांधी यांनी कोर्टात अपील करणे आवश्यक होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे. त्या सुनावणीत जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यात आली तरच त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल.