विदर्भाच्या खासदारांना गावबंदी सुरू

0

विराआंसचा इशारा : गडकरी, फडणवीसांना निवेदन देण्याआधीच कार्यकर्ते ताब्यात

नागपूर. विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भातील खासदारांना गावबंदी (village ban for Vidarbha’s MPs) घालण्याचा इशारा दिला होता. आता गावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याच विषयावर भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने विदर्भवाद्यांनी (Vidarbhavadi) १ एप्रिला गोळीबार चौकात उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेटीपूर्वीच विदर्भवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतरही काही कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचून निवेदन देण्यात यशस्वी झाल्याचा दावा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. विदर्भातील खासदार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गावबंदी सुरू राहील, 1 मे रोजी काळा दिवस पाळून कोयला रोको आंदोलन केले जाणार असल्याचा निर्धार विदर्भवाद्यांनी व्यक्त केला आहे.

गोळाबार चौकातून विराआंसचे कार्यकर्ते प्यारूभाई उर्फ नौशाद हुसैन, गणेश शर्मा, उषाताई लांबट, माधुरी चौहान, रवींद्र भामोडे, मुकेश मासुरकर, पराग वैरागडे यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या व्हॅनमध्ये डांबून पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जबरदस्त घोषणाबाजी केली, पोलिस स्टेशनमध्ये जवळपास तीन तास सर्वांना बसवून ठेवल्या नंतर रात्री ९.३० वाजता सोडण्यात आले.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दाव्यानुसार या कारवाईनंतरही पोलिसांना चुकवत नागपूर शहर महासचिव नरेश निमजे व तारेश दुरुगकर यांनी नितीन गडकरी यांना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिती करीता आपली व आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याबाबत निवेदन दिले. तसेच फडणवीस यांनासुद्धा विदर्भाचा ठराव आपल्या मंत्रिमंडळात मांडून तो केंद्रा कडे पाठवावा व प्रस्तावित वीज दरवाढ मागे घेण्याकरीता निवेदन दिले. यावेळी तात्यासाहेब मत्ते, ज्योतीताई खांडेकर, राजीव म्हैसबडवे, वासुदेव मासुरकर, अनिल केशरवाणी, अमूल साकुरे, विजय मोंदेकर, चिंतले गुरुजी, प्रकाश कुंटे उपस्थित असल्याचे समितीने कळविले आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचे भय शासन प्रशासना मध्ये दिसून येत आहे, रस्त्यातूनच कार्यकर्त्यांना उचलणे ही दडपशाही नाही का? मंत्र्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकूनच घ्यायचे नसेल तर मग त्यांनी सार्वजनिक ठिकाणी यायचेच कशाला? असा सवाल युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी केला आहे.