नागपूर जिल्ह्यासाठी पाऊस,वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी राहावे सतर्क

0

 

नागपूर: दि. 15 : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात 16 मार्च ते 19 मार्च या कालावधीत वादळी वारा,गारपीट, वीज सोबतच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून 16 व 17 मार्च करिता ऑरेंज तर 18 व 19 मार्च करिता येलो अलर्ट जारी केला आहे. या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा, गहू, मोहरी, जवस) पिकाची आवश्यक काळजी घ्यावी. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असता घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे रहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठ्या मधेच चारा व पाण्याची उपलब्ध करून द्यावी. शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष हेल्पलाईन क्र: ०७१२-२५६५२३० आहे.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा