सरकार पडणार असल्याचा राऊतांचा दावा भुजबळांनीच खोडला

0

नाशिकः राज्यातील सरकार कोसळणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत करीत असले तरी त्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादीकडून छेद दिला गेलाय. राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार अशी काही परिस्थिती नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal ) यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बरेच काही अवलंबून आहे. १६ आमदार अपात्र झाले तरी त्यांच्याकडे सध्या १६५ आमदार असल्याने सरकारला धोका नाही, असेही भुजबळ म्हणाले. संजय राऊत यांनी कालच यासंदर्भातील दावा केला होता. संजय राऊतांचा हा दावा छगन भुजबळांनी फेटाळून लावला.
भुजबळ म्हणाले की, १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. निकाल त्यांच्याविरुद्ध गेला तर शिंदे मुख्यमंत्रीपदावरून जातील. पण दुसरा मुख्यमंत्री येईल. तथापि, या जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच, याची काय खात्री? जर समजा तसा निकाल आलाच तर मुख्यमंत्रीपद गेले तरी सरकारला 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 149 आमदार शिल्लक राहतात. सरकार त्यांचेच राहील, असेही भुजबळ म्हणाले आहेत.