मुंबईः “2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढेल की नाही, हे आत्ताच कसे सांगणार? एकत्र लढण्याची इच्छाच पुरेशी नसते”, अशी गुगली टाकून महाविकास आघाडीत अस्वस्थता माजविल्यावर शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी आपल्या वक्तव्यावर पुन्हा घूमजाव केले आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनीी केला आहे. पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत अजून जागावाटप निश्चित नाही. मात्र, मविआ टिकून रहावी, हा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 2024 च्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सोबत लढेल काय? आणि यात वंचित आघाडी पण एकत्र येईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला होता. यावर पवार यांनी वंचित आघाडीशी आमची चर्चाच झालेली नाही, असेही सांगितले होते.
पवारांच्या वक्तव्यावर ठाकरे गटात खळबळ माजून संजय राऊत यांनी सकाळीच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अनेकदा शरद पवार यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटावी, असे शरद पवारांना अजिबात वाटत नसेल. या क्षणी ‘मविआ’ मजबूत आहे. त्यामुळेच राज्यभरात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र सभा घेत आहोत. आम्ही एकत्र आहोत, हे सांगण्यासाठीच या सभा घेत आहोत, असे राऊत म्हणाले. तर दुसरीकडे पवारांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव करीत आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला.