इंटर्नशिप बहाल, वसतिगृहात मात्र येता येणार नाही
नागपूर. मेडिकलमधील रॅगिंग प्रकरणाला (Raging case in Nagpur medical) नवीन वळण आले आहे. येथील इंटर्नशिप रद्द झालेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेडिकलच्या रॅगिंग विरोधी समितीला (Anti-Ragging Committee ) सोपवला होता. त्यानुसार समितीने सर्वांना पुन्हा इंटर्नशिप बहाल (Internship awarded again ) केली. परंतु, त्यांच्यावरील वसतिगृहातील प्रतिबंध मात्र कायम (restrictions remain in Hostel) ठेवले. या निर्णायामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी वेगळीच चर्चाही सुरू झाली आहे. सोमवारी झालेल्या समितीच्या बैठकीत सहाही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे म्हणणे पुन्हा ऐकण्यात आले. त्यांच्याकडून पुढे अनुचित प्रकार घडणार नसल्याचे लेखी घेत इंटर्नशिप बहाल केली गेली. परंतु इंटर्नशिपवरून काढल्यापासूनच्या अतिरिक्त कालावधीसाठी त्यांना पुन्हा इंटर्नशिप करावी लागणार आहे. सगळ्यांवर वसतिगृहात प्रतिबंध मात्र कायम ठेवण्यात आला असून या भागात दिसल्यास कारवाईची तंबी देण्यात आली आहे.
नागपूर मेडिकलमध्ये नोव्हेंबर महिन्यात हे रॅगिंगचे प्रकरण समोर आले होते. मेडिकलमध्येच इंटर्नशिप करीत असलेल्या सहा जणांनी मिळून ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याची रॅगिंग घेतल्याचा व्हीडियो समोर आला होता. त्याच आधारे ‘ॲण्टी रॅगिंग कमिटी’सह मेडिकल प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून मेडिकलच्या सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करून त्यांची वसतिगृहातूनही हकालपट्टी केली गेली होती. दरम्यान, चित्रफीतीत न दिसणाऱ्या सहापैकी ३ विद्यार्थ्यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी रॅगिंग झाले नसल्याचेही लेखी दिले. परंतु. न्यायालयाने दोन्ही बाजू जाणून कारवाईचा निर्णय मेडिकलमधील रॅगिंग विरोधी समितीवर सोपवला. त्यानुसार समितीने विद्यार्थ्यांच्या बाजुचा निर्णय घेतला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयासह त्यावर समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासह राष्ट्रीय रॅगिंग समितीलाही दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या वृत्ताला मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.