गडचिरोलीत वाघाच्या २ बछड्यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळले

0

टी-६ वाघिणीचे बछडे असण्याची शक्यता : वनविभागाकडून हिंस्त्र वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू
गडचिरोली. तालुक्यातील अमिर्झा बीटअंतर्गत (Amirza beat in Gadchiroli taluk) पाच महिन्यांचे वय असलेल्या वाघाच्या दोन बछड्यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले आहेत. अमिर्झा परिसरात अत्यंत हिंसक असलेल्या टी-६ या वाघिणीचा (T-6 Tigress) मागील दोन वर्षांपासून वावर आहे. या वाघिणीला एकूण चार बछडे होते. अलीकडेच ही बाघिण बछड्यांसह ट्रॅपकॅमेऱ्यामध्ये ट्रॅप झाली होती. मृतदेहाचे अवशेष आढळलेले बछडे याच वाघिणीचे असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वाघिणीने आजपर्यंत १० नागरिकांचा बळी घेतल्याची (Tigress has killed 10 citizens) नोंद वनविभागाकडे आहे. बछड्यांच्या मृत्यूनंतर वाघिण अधिकच हिंसक होण्याची शक्यता आहे. यामुळे वनविभागाने या हिंस्त्र वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. जंगला लगतच्या गावातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले असून एकट्या दुकट्याने जंगलाच्या भागात जाणे टाळले जात आहे.
पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात ‘टी-६’ वाघिणीसह आणखी पाच वाघांचा वावर आहे. ३ जानेवारी रोजी एका बछड्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळले. त्यानंतर ६ जानेवारी रोजी पुन्हा २०० मीटर अंतरावर दुसऱ्या बछड्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळले होते. अवशेषांमध्ये डोक्याची कवठी व शेपटीचा समावेश आहे. या परिसरात वास्तव्य असणाऱ्या एखाद्या वाघाने बछड्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढल्याची माहिती गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीशकुमार शर्मा यांनी दिली. व्यक्त केला जात आहे. ज्या परिसरात अवशेष आढळले तेथे वाघाची विष्टा आढळून आली. अवशेष हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. या ठिकाणी डीएनए चाचणी होईल. त्यानंतर सदर बछडे नेमके कोणत्या वाघाचे आहेत हे स्पष्ट होईल. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि अन्य तज्ज्ञांची चमू चार-पाच दिवसांपासून परिश्रम घेत आहे.