राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही, सगळेच दु:खी
शरद पवारांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका

0

कोल्हापूर. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) दु:खी असतील तर आम्हीही सगळेच दु:खी आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी लगावला आहे. आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. मात्र, भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याचे ते म्हणाले. गेल्या काही काळापासून विरोधकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केले आहे. संधी मिळेल तेव्हा त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जाते. त्यांना या पदावरून परत बोलावून घ्यावे यासाठीही प्रयत्न केले गेले. मात्र, त्यांना यश येऊ शकले नाही. महापुरुषांचा अपमान करीत असल्याची नाराजी विरोधकांकडून सतत व्यक्त केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी हा विषय उचलून धरला होता. सभागृहात हा विषय आला नसला तरी सभागृहाबाहेर विरोध पक्षांतील आमदारांनी आंदोलन करीत लक्ष वेधले होते.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राची एक परंपरा आहे. महाराष्ट्रातील लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावे यासाठी घेता येतील. महाराष्ट्राला अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक राज्यपाल म्हणून मिळाले. मात्र, सध्याचे भगतसिंह कोश्यारी हे राज्याचे पहिले राज्यपाल असतील ज्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते.
महाराष्ट्रात यापूर्वी जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण संपूर्ण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले. घटनेनुसार काम केले. मात्र, भगतसिंह कोश्यारी हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही. भगतसिंह कोश्यारी सतत चुकीची वक्तव्ये करत असतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे योग्य नाही. राज्यपालपद हे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे राज्यपाल पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे.
छत्रपती संभाजी महाराजांवरुन वाद योग्य नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक म्हणावे, अशी भूमिका मांडली आहे. यावरुन भाजपने अजित पवारांवर टीका केली जात आहे. या वादावर शरद पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणणे फारसे चुकीचं नाही. यावरून वाद निर्माण होणे चुकीचे आहे.
महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार
लोकसभा व विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रापुरता आम्ही आघाडीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही शरद पवार म्हणाले. तसेच, तसेच, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे राज्यात जातीयता वाढल्याचा आरोप केला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, जातीयवादाचा विचार आमच्या मनात नाही. शाहू, फुले, आंबडेकर यांच्या विचारांची आम्ही माणसं आहोत. जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी आमची मागणी आहे. यामुळे लहान घटकांची मोजदाद होईल. नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत आहे.