गद्दारांवर सूड उगवण्याची वेळ
खासदार संजय राऊत यांचे टीकास्त्र

0

नाशिक. शिवसेनेचा (Shivsena) वणवा आता संपूर्ण राज्यभर पेटला असून, या वनव्याशी आता कुणी खेळण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेतून जे गेले ते गद्दार आहे. या गद्दारांवर आता सूड उगवण्याची वेळ आली आहे. यापुढे राज्यात खोक्यांचे राजकारण चालणार नाही, अशी तजवीज शिवसेना करेल. त्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. इतिहास निष्ठावंतांचा लिहिला जातो. गद्दारांचा नव्हे, गद्दारांवर सूड उगवण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj ) यांनादेखील बेइमान लोकांचा त्रास झाला होता. स्वराज्याचे स्वप्न साकारताना महाराजांनी २२१ लढाया स्वकीयांशीच लढल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. तेव्हादेखील त्यांना स्वकीयांशीच सामना करावा लागला होता. माझ्या पाठीत खंजीर खुपसायला जागाच शिल्लक नाही, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब नेहमी सांगत असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
शिवसेनेच्या शालीमार येथील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राऊत यांनी राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी जनता आतुर झाली असून, या माध्यमातून नाशिक महापालिकेवर भगवा फडकवतील, असा दावा केला.
शिवसेनेला गद्दारीचे संकट नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक संकटातून शिवसेना अनेकदा उभी राहिली आहे. गद्दारा विरोधात संतापाची लाट उसळली आहे. निष्ठावंत शिवसैनिक अधिक जोमाने पेटून उठला आहे. जनतादेखील निवडणुकीची वाट पाहत असून ज्यांनी गद्दारी केली. त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे. मतदान हे खोक्यांवर चालत नाही असा घाणाघात राऊत यांनी केला. शिवसेना अस्वला सारखी आहे. अस्वलाचे काही केस गळून पडले तरी फरक पडत नाही. परंतु शिवसेनेला सोडून जे गेले तेथे अस्वल कोण आणि मदारी कोण, मदारी अस्वलाला नाचवतो की अस्वल मदारीला नाचवते, हे कळत नाही.
‘ते चप्पल चोर’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंट्रोल करणारे महामदारी दिल्लीत बसल्याची टीका त्यांनी केली. शिवसेना हे मंदिर असून, शिवसेनाप्रमुख हे मंदिरातील दैवत आहे. या मंदिरात चोरी करणारे गद्दार महाराष्ट्राने पाहिले आहेत. या गद्दारांना महाराष्ट्र सोडणार नाही. ते चप्पल चोर आहेत, अशी टीका त्यांनी केली. बेईमानांना दरवाजे बंद असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे उपनेते बबन घोलप जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचीही भाषणे यावेळी झाली. उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, आमदार नरेंद्र दराडे, माजी महापौर वसंत गिते, विनायक पांडे, गटनेते विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे आदी या वेळी उपस्थित होते.
४० आमदार, १२ खासदार कुठे जातील?
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मिशन १४५ ची घोषणा केली. तर लोकसभा निवडणुकीसाठी मिशन ४५ ची घोषणा केली. भाजपच्या या मिशनची खिल्ली उडवताना शिंदे गटात गेलेले ४० आमदार व बारा खासदार कुठे जातील, असा सवाल राऊत यांनी केला. यावर शिवसैनिकांनी ते सर्व घरी जातील, अशी प्रतिक्रिया दिली.