नागपूर : नागपुरात अनेक चौकांमध्ये वाहनचालकांकडून भीक मागण्याचे प्रकार सर्रास घडतात. त्याबद्धल बऱ्याच तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, आता पोलिसांनी शहरात कलम १४४ अन्वये रस्त्यांवर, ट्रॅफिक सिग्नल्सवर, चौकांवर थांबून भिकाऱ्यांच्या भीक मागण्यावर तसेच तृतीयपंथीयांद्वारे वाहनचालकांकडून पैसे मागण्यावर बंदी घातली (Action against Beggers in Nagpur) आहे. या आदेशाची आज गुरुवारपासून अंमलबजावणी होणार असून तो ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास आयपीसी कलम 188 अन्वये संबंधित व्यक्तीच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर पोलिसांनी यासंदर्भीात काढलेल्या परिपत्रकातून दिलाय. दरम्यान, नागपुरात २१ मार्चपासून जी-२० च्या बैठकांचे आयोजन होत असून परदेशी पाहुण्यांपुढे चुकीचे चित्र निर्माण होऊ नये, यासाठी हे परिपत्रक काढण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
उपराजधानी नागपुरात रस्त्यांवर चौकांवर ट्रॅफिक सिग्नल्सवर भिकारी तसेच तृतीयपंथयाद्वारे वाहन चालकाकडून पैसे मागण्याचे प्रकार वाढले होते. काही ठिकाणी भिकारी आणि तृतीयपंथियांकडून वाहन चालकांना दमदाटीही केली जात असल्याचे प्रकार घडले आहेत. विशेषतः पंचशील चौक, शंकर नगर चौक, व्हरायटी चौक, रेशीमबाग चौक तसेच छत्रपती चौकात असे प्रकार मोठ्या संख्येने घडत आहेत. यावर तक्रारी देखील झाल्या आहेत. पंचशील चौकात उड्डाणपुलाच्या आडोश्याने तसेच यशवंत स्टेडिअमपुढे मुक्काम ठोकणाऱ्या भिकाऱ्यांवर अनेकदा कारवाई झाली आहे. मात्र, काही दिवसानंतर परिस्थिती जैसे थे होत असल्याचा अनुभव नागपूरकरांना आला आहे. आता पोलिसांनी या प्रकारांवर ३० एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. २१ मार्चपासून शहरात G-20 च्या उपसमितीची बैठक होत आहे. त्यासाठी 21, 22 आणि 23 मार्च रोजी सुमारे 200 परदेशी पाहुणे नागपुरात राहणार आहे. नागपूरबद्धलचे चुकीचे चित्र उभे राहू नये, या दृष्टिने हे बंदी आदेश लागू केल्याची चर्चा आहे. मात्र, रस्त्यांवर भिकाऱ्यांकडून तसेच तृतीयपंथीयांकडून होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.