नागपूरः राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करून बळीराजाला थेट आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेतानाच राज्य सरकारने विदर्भाला दिलासा देणारे अनेक निर्णय जाहीर केले आहेत. ते असेः
-विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान, विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या संस्थांचा समावेश. लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देणार.
–विदर्भ-मराठवाड्यातील १४ शेतकरी आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी प्रतीवर्ष प्रतिव्यक्ती १८०० रुपये रोख रक्कम देणार.
-विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये
– नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद.
-गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास २३-२४ मध्ये १, ५०० कोटी रुपयांचा निधी देणार. हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन.
-पूर्व व पश्चिम विदर्भाला जोडणाऱ्या वैनगंगा-पैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला चालना देणार
-वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामेः अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये.
-नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला इमारत बांधकामासाठी निधी मिळणार.
-विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये
-हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता होणार.
– नागपूर येथे मिहान परिसरात 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
– नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार होणार.
-नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा सुरु होणार ( 43.80 कि.मी./6708 कोटी लागणार)
– नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद.
– बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथील विमानतळ विकासाचे नियोजन होणार.
–अमरावती येथे स्व. रा. सू. गवई स्मारकासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद.
-नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश. या केंद्रासाठी 228 कोटी रुपये तरतूद होणार.