नागपूर : उपराजधानी नागपूर ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या 701 किमीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर-शिर्डी या 521 किमी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला होत (Samruddhi Mahamarga) आहे. अनेक दृष्टीने हा महामार्ग वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून सुरक्षित वाहतुकीसह झिरो अॅक्सिडेंटल कॉरि़डोर असणारा हा देशातील पहिलाच महामार्ग ठरणार आहे. या महामार्गाच्या लगत गॅस पाईपलाईन, इलेक्ट्रिक लाईन तसेच आप्टिकल फायबर केबलसाठी जागा सोडण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात या महामार्गावर विमान देखील उतरु शकेले, हे या महामार्गाचे वैशिष्ट्य आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर ( NAGPUR – MUMBAI ) नागपूर-मुंबई अंतर ८ तासांत पार करणे शक्य होणार आहे. आंतरराष्ट्रीय मानकांना अनुसरून हा महामार्ग त/यार झाला आहे. या महामार्गासाठी कमाल ताशी १५० किलो मीटर वेगमर्यादा राहणार आहे. ( Samriddhi Highway is such a ‘Zero Accidental Corridor’ )
शिर्डी ते मुंबई दरम्यानच्या 181 किमीचे उर्वरित महामार्गाचे काम 15 जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. समृद्धी महामार्गाच्या दोन्हीही बाजूस सर्विस रोड असून उड्डाणपूल, 25 ठिकाणी इंटरचेंजेस तसेच 7 बोगदे तयार करण्यात आले आहे. सुरळीत वाहतूक व्यवस्थेसोबत झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोर असणारा हा समृद्धी महामार्ग देशातील पहिलाच महामार्ग ठरणार आहे.
नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गाचे काम केवळ 4 वर्षात पूर्ण झाले आहे. आता 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. समृद्धी महामार्गावर दररोज 25 हजार प्रवासी गाड्यांची वाहतूक होण्याची अपेक्षा आहे. उद्घाटन कार्यक्रमाची जय्यत तयारी मिहानच्या एम्स परिसरात सुरु आहे.
११ लाख वृक्ष लावणार
समृद्धी महामार्गावर ग्रीन फिल्ड कॉरिडोर तयार करुन महामार्गाच्या दोन्ही बाजूने जवळपास 11 लाख झाडे लावण्यात येत आहे. तसेच 22 लाख विविध फुलझाडांचे रोपटे आणि फुलांच्या वेली लावल्या जात आहेत. समृद्धी महामार्गालगत नवीन 18 आधुनिक शहरे वसवली जाणार आहेत. यातील 8 शहरे पहिल्या टप्पात तयार करण्याचे नियोजन आहे. 20 फुड प्लाझा, 24 पेट्रोल पंप असतील, यातील शिर्डी येथील पेट्रोल पंप सुरु करण्यात आला आहे. याशिवाय कृषी समृद्धी केंद्र उभारण्याचे ठरले असून यामुळे शेतकरी ग्राहक समृद्धी सोबत जोडले जाणार आहेत. कृषी आधारित अर्थव्यवस्था यामुळे मजबूत होणार आहे. इंडस्ट्रिअल हब, लॉजिस्टिक हब, निवासी संकुले, टुरिझम हब, आयटी हब हे समृद्धीचे वैशिष्ट्ये ठरणार आहेत.