रत्नागिरी : स्वतःला ठाकरेनिष्ठ म्हणविणारे खासदार संजय राऊत यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला (Shiv Sena Leader Ramdas Kadam allegations on Sanjay Raut) आहे. रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना कदम यांनी सांगितले की, संजय राऊत हे खरे शिवसैनिक नाहीत. पण उसणे अवसान आणून आपणच शिवसेना वाचवत आहोत, असा अविर्भाव दाखवून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला ते फसवत आहेत, अशी टीका रामदास कदमांनी केली. राऊतांच्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती केली, तेव्हा माझ्यासमोर संजय राऊतांनी दोघांना अश्लील भाषेत शिव्या घातल्या. कदाचित, संजय राऊत हे विसरले असतील पण, मी हे विसरलेलो नाही, असा गौप्यस्फोटही कदमांनी केला आहे.
कदम म्हणाले, संजय राऊत तुम्ही उसणे अवसान आणून शिवसेना तुम्हीच वाचवत असल्याचा अविर्भाव आणून महाराष्ट्राला आणि देशाला आपण फसवत आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की बाटगा अधिक कडवा असतो तेच कडवेपण तुम्ही दाखवत आहात. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे, असा आरोप राऊतांनी केला होता. याला प्रत्युत्तर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचे हे कारस्थान आहे. मात्र लवकरच संजय राऊत यांचा भंडाफोड करणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला. शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दादागिरीच केली. ते हुकुमशहा झाले. मला व माझ्या मुलाला आमदार योगेश याला संपवायचा प्रयत्न त्यांनी केला. आपल्याच पक्षाच्या असलेल्या आमदाराला आपणच कसे संपवता? कोणता पक्षप्रमुख असा वागतो, असा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.