उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार, त्या प्रकरणात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

0

अलिबाग : राज्यात सत्तासंघर्षावरून तणातणी सुरुच असताना 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोर्लई येथील ठाकरे आणि वायकर कुटूंबियांच्या नावावर असलेल्या जागेतील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायती अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यावर अखेर रेवंदडा पोलीस ठाण्यात (Revdanda Police case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सरकारी रेकॉर्डमध्ये खाडोखोड करुन फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात कोर्लई ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी (BJP Leader Kirit Somaiya) या प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरुडच्या ग्राम विकास अधिकारी संगिता भांगरे यांनी याबाबतची तक्रार नोंदविली आहे. भादंवी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये ग्रामसेवक विनोद मिंडे, देवंगणा वेटकोळी, देविका म्हात्रे, गोविंद चंदर वाघमारे, रेश्मा रमेश मिसाळ, रेमा रमेश पिटकर आणि प्रशांत जानू मिसाळ या आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याशी उद्धव ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. यादरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या चौकशीतून काही माहिती समोर आली तर ठाकरे कुटुंबाकडून माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातील. यामुळे उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या अडचणी वाढू शकतात, असे जाणकारांना वाटते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लईत उद्धव ठाकरे यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार केला आहे.