विधीमंडळ हे ‘चोर मंडळ’ असल्याच्या टीकेमुळे संजय राऊत अडचणीत, हक्कभंगाची नोटीस

0

 

मुंबईः ‘विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. खासदार राऊत यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. (Sanjay Raut controversial statement) खासदार राऊत यांच्या या विधानानंतर भाजप आणि शिवसेना आमदार विधीमंडळात आक्रमक झाले असून महाविकास आघाडीतील नेत्यांनीही खासदार राऊत यांच्या वक्तव्यावर नापसंती व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी खासदार राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब झाले.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार, भरत गोगावले, यामिनी जाधव आक्रमक झाल्या. भाजप आमदारांच्या मागणीवर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील मत माडत खासदार राऊत यांच्या विधानावर नापसंती व्यक्त केली. संजय राऊत यांच्या विरोधात अतुल भातखळकर यांच्याकडून हक्कभंग प्रस्तावाची नोटीस देण्यात आली आहे. अतुल भातखळकर यांच्या नोटीसवर बोलताना अजित पवार यांनी वक्तव्य नेमके काय होते ते तपासून घ्यावे, असे म्हटले. बाळासाहेब थोरात यांनी या विषयी बोलताना विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणे चूक असून त्याचवेळी विरोधकांना देशद्रोही म्हणणे देखील चुकीचे असल्याचे सांगितले.
भरत गोगावले यांनी देखील संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणला जावा व हे प्रकरण तातडीनं हक्कभंग समितीकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी केली. ही मागणी करताना भरत गोगावले यांनी देखील असंसदीय शब्दांचा वापर केला. गोगावले यांच्या वक्तव्यार आमदार रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेतला. यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विधानसभा अध्यक्षांनी यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

काय म्हणाले राऊत?
बुधवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असे म्हणत शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला. बनावट शिवसेनेने पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असेही राऊत म्हणाले. बेळगाव प्रकरणी तुरुंगात गेल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी कागदपत्रे दाखवावीत, असे आव्हानही त्यांनी दिले होते.
काय म्हणाले अजित पवार?
संजय राऊत यांच्या वक्तव्यवावर बोलताना अजित पवार यांनी नापसंती व्यक्त केली. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला, व्यक्तीला, नागरिकाला अशा प्रकारे चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर मी ती बातमी बघितली. मी आशिष शेलारांच्या मताशी सहमत आहे. राजकारण बाजूला ठेवून याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. प्रत्येकाने शिस्त पाळायला हवी. संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. पण कुणी काहीही बोलायला नको. राऊत यांच्या वक्तव्याच्या बातमीत तथ्य आहे का, हेही तपासून बघायला हवे. त्याची शहानिशा करून त्यावर योग्य तो निर्णय विधिमंडळाने घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.