वर्धा. साहित्य ठेवण्याची गरज दर्शवित शेतात झोपडी उभारली गेली. एकांतात असणाऱ्या या झोपडीतून भलतीच भानगड सुरू होती. सावंगी पोलिसांना (Savangi Police) याबाबत कुणकुण लागली. त्यांनी छापा टाकून येथे देहविक्रीचा व्यवसाय (Prostitution business ) सुरू असल्याचे उघडकीस आणले. पोलिसांनी येथून पीडित महिलेची सुटका केली. आरोपी पैसांचे आमिष दाखवून तिच्याकडून हा प्रकार करवून घेत असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सोमवारी रात्री उशिरा वर्धा येथील नागठाणा (Nagthana in Wardha ) परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संबंधित झोपडीला सील ठोकले. सावंगी पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरात देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कारवाईमुळे या भागात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
जीवन दत्तू मोहर्ले असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो मूळचा रोठा वेणी ता. कळंब, जि. यवतमाळ येथील रहिवासी असून सध्या सावंगी परिसरात वास्तव्यास आहे. नागठाणा परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची नागरिकांची तक्रार होती. मात्र, त्याकडे फारसे लक्षच दिले जात नव्हते. यामुळे लोकांमध्ये रोष वाढत होता. पोलिसांनी सोमवारी रात्री सापळा रचला. प्रारंभी देहविक्री व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणाबाबत खात्री करण्यात आली. ठरल्यप्रमाणे पोलिसांनी बनावट ग्राहक तेथे पाठविला. आरोपी जीवन याने वर्धा येथील रहिवासी एका ३३ वर्षीय महिलेला तेथे बोलावून बनावट ग्राहकास वेश्या व्यवसाय करण्यास उपलब्ध करुन दिले. त्याने इशारा देताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकून महिलेसह आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी जीवन पीडित महिलेला स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी देहविक्री करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे पीडितेने सांगितले. सावंगी पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली. सावंगी पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला अटक करुन त्याच्याविरुद्ध कलम ४,५,७ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे, सतीश दरवरे, प्रशांत वंजारी, श्रावण पवार, पंचटिके, महिला पोलिस कर्मचारी ठाकरे, मीना माईंदे यांनी केली.