१७० अत्याधुनिक फायर फायटिंग सुटमुळे मनपाच्या अग्निशमन यंत्रणेला बळकटी

0

 

नागपूर : आग लागलेल्या ठिकाणी व आणीबाणी परिस्थिती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणा-या अग्निशमन विभागातील जवानांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर महानगरपालिका कटीबद्ध आहे. मनपाद्वारे जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले. अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १७० व्यक्तिगत सुरक्षा उपकरण व ५० नग श्वसन उपकरण खरेदी केले आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारा विकास वाढती इमारतींची उंची या सर्व बाबींच्या अनुषंगाने अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाच्या अग्निशमन यंत्रणेच्या ताफ्यात अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित फायर फायटिंग सूटचा समावेश करण्यात आला आहे. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आवारात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी.यांनी फायर फायटिंग सूटचे निरीक्षण केले. याप्रसंगी नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय गुल्हाने, उपायुक्त रवींद्र भेलावे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे यांच्यासह अधिकारी व अग्निशमन जवान, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अग्निशमन विभागामार्फत आयुक्तांना मानवंदना देत आगीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या कार्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १७० फायर फायटिंग सूट व जर्मन बनावटीचे ५० नग Self Content Breathing Apartus Set (B. A. Set) खरेदी केले आहेत. या सूटमध्ये वापरलेले कापड हे परदेशातून आणण्यात आले असून, हा सूट भारतात तयार करण्यात आला आहे.
अग्निशमन विभागाला मिळालेला फायर फायटिंग सूट हा प्रॉक्सिमिटी सूट आहे. हा सूट अग्निशमन जवानांना कोणत्याही फ्लेशओव्हरपासून अर्थात आगीच्या ज्वालांपासून वाचवेल, या सूटचे सर्व भाग युरोपियन मानकांनुसार प्रमाणित करण्यात आले आहेत. सूटमध्ये जॅकेट पॅन्ट हुड, हातमोजे, हेल्मेट आणि बूट यांचा समावेश आहे. सूट मधील जॅकेट आणि पायघोळ हे Nomex नावाच्या जगातील सर्वोत्कृष्ट फॅब्रिकसह तयार केले जाते आणि ते मूळतः फ्लेम रिटाईट आहेत. जॅकेट आणि पायघोळ ३ थरांनी बनलेले आहेत यातील बाहय भाग कोणत्याही थेट ज्वालाच्या संपर्कापासून जवानांचे संरक्षण करतो. तर मधला थर, ज्याला मॉइश्चर बेरियर असेही म्हणतात, हा थर जवानाला कोरडा ठेवतो. सर्वात आतील थर हा थर्मल बेरियर आहे, जो जवानाला तेजस्वी उष्णतेपासून वाचवतो. जवानांचे बूटला स्टील टो कँप आणि स्टील मिड सोल ने तयार केले आहेत. जे फायरमनच्या पायाचे कोणत्याही जड आणि तीक्ष्ण वस्तूपासून संरक्षण करते. १५KV पर्यंत इलेक्ट्रिक शॉक प्रूफ करण्यासाठी बूटांची चाचणी देखील करण्यात आली आहे. बूटांच्या दुहेरी रंगामुळे ते दूरवरून दृश्यमान होईल. बूट सहजपणे वाहून नेण्यासाठी आणि खेचण्यासाठी लूप दिले जातात.
फायरमन हेल्मेटला वायझर आणि इनर गॉगल दिलेले आहेत. फायरमन गरजेनुसार दोन्ही किंवा कोणतेही वापरू शकतो. अतिरिक्त संरक्षणासाठी अल्युमिनाइझ्ड नेक प्रोटेक्टर देखील प्रदान केले आहेत. हातमोजे कोणत्या ही गरम वस्तूपासून जवानांचे संरक्षण करतील. हूड फायरमनच्या चेह-याला तेजस्वी उष्णतेपासून अतिरिक्त संरक्षण देईल. याशिवाय बी. ए. सेटचे सिलेंडर Carbon Composit Aluminum alloy या पदार्थाने बनलेले असल्याने वजनाने फार कमी असून याचे वजन १३ कि.ग्रॅ. आहे. त्यामुळे वापर करतेवेळेस कार्य करण्यास सोयीचे होते. बी. ए. सेटचे सिलेंडरची क्षमता ६.८ लिटर असून यामध्ये ३०० bar दाबाने हवा भरल्यास यामध्ये २०४० लि. हवेची क्षमता आहे. दुर्घटनांवर कार्य करते वेळेस ५३ मि. पर्यंत कार्य करता येते. सदर बी. ए., सेट आधुनिक असल्याने यामध्ये डिजिटल प्रेशर गेज व डिस्ट्रेस सिग्नल युनिट लागलेले आहेत.त्यामुळे दुर्घटनास्थळी आतमध्ये बी. ए. सेट घालून काम करणारा कर्मचाऱ्याला त्याच्यासोबत काही दुर्घटना होवून तो आपत्तीमध्ये आल्यास अशावेळेस Distress Signal Unit, Alarm देतो. त्यामुळे त्याचा शोध घेता येतो.या. बी. ए. सेट मध्ये टेलिमॅटिक सिस्टम लावता येई अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यात ती व्यवस्था लावता येईल.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा