Home Top News सावरकरांचे काव्यविश्व : एक चिंतन

सावरकरांचे काव्यविश्व : एक चिंतन

0

 

– राजेंद्र नाईकवाडे

भारतीय संस्कृतीच्या इतिहासाच्या गेल्या ५ हजार वर्षांचा कार्यकाळ बघता, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखा प्रेरक आणि असामान्य कर्तृत्वाचा महापुरुष विरळाच म्हटला पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या पुण्यप्रवाहाचे आधुनिक काळात पुनरुज्जीवन करणार्‍या थोर महामानवांमध्ये स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि वि. दा. सावरकर ही काही नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतात. सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा म्हणजे साधारपणे तत्कालीन नियमांनुसार ५० वर्षांची शिक्षा इंग्रज सरकारने ठोठावली होती. एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा मोबदला म्हणून मिळालेली अशी शिक्षा अपूर्वच म्हटली पाहिजे. अशा शिक्षेला तोंड देण्यास सिद्ध झालेल्या सावरकरांनी त्या कारावासाच्या अवकाशाचे महाकाव्यात रूपांतर करण्याची जी कल्पना मांडली तीसुद्धा अपूर्वच! केवळ प्रतिभा आणि प्रज्ञा यांच्या बळावर इंग्रजांच्या साम्राज्यशाहीला उत्तर देण्याचा उपाय सावरकरांसारख्या प्रखर बुद्धिमंताजवळ आणखी कोणता असणार? म्हणूनच कारावासाचे महाकाव्यात रूपांतर करण्याची ही कल्पना अनेकांना विलक्षण व अद्भुत वाटल्यास आश्चर्य नाही. सावरकरांचे अवघे जीवितच बालपणापासून भव्य, दिव्य आणि उदात्त कल्पनांनी भारलेले दिसते. बंदिवास म्हणजे विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य या सार्‍यांनाच बंदिवास. पण, हा बंदिवास भोगता भोगताच कल्पनेने मात्र स्वतंत्र होणे. काव्य लिहून स्वातंत्र्य उपभोगणे ही अनोखी कल्पना करणारे व ती कल्पना प्रत्यक्षात साकारणारे सावरकर हे मराठी, भारतीय आणि जागतिक वाङ्मयात एकमेवाद्वितीय कवी ठरतात. त्यांच्या बहुतांशी कविता, दीर्घकाव्ये त्यांनी अंदमानच्या आणि इतर तुरुंगातच लिहिल्या. मराठी काव्यप्रवाहात देशभक्तीच्या जाणिवांचे शब्द-प्रतिमांशी झालेले असले अद्वैत दुसरीकडे कुठेच आढळत नाही. राष्ट्रीय काव्याचा जो प्रवाह स्वातंत्र्यूर्व काळात निर्माण झाला आणि स्वातंत्र्योत्तर काळातही वाहत राहिला त्याचे जनक सावरकरच ठरतात. ज्याप्रमाणे अनेकांनी केशवसुतांच्या आगेमागे कविता लिहिल्या, परंतु आधुनिक मराठी काव्याचे जनकत्व मात्र त्यांच्याकडेच दिले गेले, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांना आधुनिक मराठी राष्ट्रीय कवितेच्या जनकत्वाचा मान दिला पाहिजे.

 

 

संतकवींच्या काव्यात ज्याप्रमाणे आत्यंतिक ईश्वरभक्तिभावाचा प्रत्यय येतो, तीच आत्मनिष्ठा, तेच तादात्म्य, तीच अद्वैतानुभूती आणि त्यातून काव्यास प्राप्त होणारी महात्मता सावरकरांच्याही काव्यात देशभक्तिभावाच्या रूपात दिसून येते. कळकळ आणि उत्कटता या संदर्भात संतकाव्याशी त्यांची कविता नाते सांगते. महाकाव्याच्या संदर्भात विचार करता ज्ञानदेवांची तत्त्वज्ञानपर दीर्घकाव्ये, मुक्तेश्वरांची आख्यानकाव्ये, नरींद्राचे रुक्मिणीस्वयंवर, भास्करभट्टांची उद्धवगीता ही प्राचीन मराठीतील महाकाव्ये मानली जातात. (डॉ. द. भि. कुलकर्णी) याच परंपरेत आणि मराठी काव्यप्रवाहात महाकाव्यानिर्मिती करणारे एकमेव मराठी कवी म्हणजे सावरकर. केवळ व्यंग्यार्थाने नव्हे, किंवा केवळ महाकवीची प्रतिभा म्हणून किंवा स्फुटकाव्यातून व्यक्तवलेला कल्पनाविलास म्हणून नव्हे; तर खरोखरीच सावरकरांच्या काव्यसंभाराच्या आधारे आपण त्यांना आधुनिक महाकवी अशी उपाधी देऊ शकतो.

 

 

‘सावरकरांची कविता’(१९४३) या संपादित काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत वा. गो. मायदेव यांनी सावरकरांच्या काव्यलेखन प्रवासाचे चार कालखंड कल्पिले आहेत. पहिले १८९३ ते१९०२ हे दशक प्राथमिक पातळीवरील फटके, लावण्या, पदे, पोवाडे या लेखनाचे. दुसरे १९०३ ते १९१२ व तिसरे १९१३ ते १९२४. ही दोन दशके प्रामुख्याने स्फुट व दीर्घ भावकाव्यलेखनाची. हाच सावरकरांच्या काव्यलेखनाचा महत्त्वाचा व मध्यवर्ती कालखंड. अखेरची दोन दशके १९२४ ते १९४३ (सावरकरांची कविता या संपादित संग्रहापर्यंतचा) ही काहीशी प्रचारकी स्वरूपाच्या काव्यलेखनाची. त्यांच्या दीर्घकाव्यात गोमंतक (४८१२ ओळी, लेखन रत्नागिरी), महासागर (५३२, अंदमान), ‘सप्तर्षि’ (५१४, डोंगरी व भायखळा, १९१०), कमला (४७२, अंदमान,१९११. कमलाविषयी वसंत आबाजी डहाके, वाङमयकोशात ८८२ ओळींचा उल्लेख करतात) या रचनांचा समावेश होतो. याशिवाय ‘चांदोबा चांदोबा’, ‘सायंघंटा’, ‘मूर्ति दुजी ती’, ‘रवींद्रनाथांचे अभिनंदन’, ‘आकांक्षा’, ‘मरणोन्मुख शय्येवर’ या त्यांच्या इतर दीर्घकविता अंदमानच्या कालकोठडीत लिहिलेल्या. ‘सप्तर्षि’ हे आर्यावृत्तातील कवण म्हणजे तुरुंगातील कष्टमय जीवनावर मात करण्यासाठी केलेली कल्पनारम्य प्रतिसृष्टी-निर्मिती होय.(पूवार्ध-डोंगरी, उत्तरार्ध- भायखळा) या रचनेतून सावरकरांच्या व्यापक मानवतावादी विचारांचे दर्शन घडते. महाकवीचं एक लक्षण तो कोणत्याही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या प्रभावाखाली वावरत नसतो! ह्याचे प्रत्यंतर ‘सप्तर्षि’तील पुढील आशयातून व्यक्त होते…’ सप्तर्षींनो, भिंतीभोवती भिंती घालून नि कुलपावर कुलपे ठोकून या कोठडीत मला बुजवून टाकलेले आहे, पण तुम्ही आपले किरणदूत मला भेटण्यासाठी इथेही पाठवून दिलेत. तुमच्या दयाळूपणाला प्राणिपात!…. सप्तर्षींनो, तुम्ही म्हणजे अनंत तेजाची सात विश्वे आहेत. ….सप्तर्षींनो तुमच्या विश्वात मांसाहारी प्राणीच नसल्यामुळे हत्या संपली आहे ना? येथे भूमीवर, पाण्यात किंवा आकाशात संचार करणार्‍या प्राण्यांनी विश्वाच्या अधिपत्याखाली राष्ट्राराष्ट्रांतील कलह थांबवून एकाच सार्वभौम राष्ट्राची स्थापना केली आहे ना? भूतदयेच्या ध्येयाने प्रेरित होऊन येथील सारे निर्णय

 

 

शस्त्रांऐवजी परस्पर-संवादाने होतात ना?….
….. मंजुलतेसहची का संगीतावरि सुगंध झुलताती!
का त्या सुगंधतेसह गीत चंदन-वनात फुलताती?” (आर्या, १८६)
कवीची अद्भुत कल्पनाशक्ती वैज्ञानिक सत्याला आणि आधुनिक काळातील नव्या शोधांना कशी स्पर्श करते हे पाहणे उद्बोधक ठरते- “सप्तर्षींनो, तुम्ही असंख्य प्रकाश वर्षे माझ्यापासून दूर आहात. कित्येक शतकांपूर्वी इथून परतलेले काही किरण आता कुठे तुमच्यापर्यंत पोचले असतील. त्या किरणांमधली प्रकाशचित्रे धरून ठेवाल का? त्यात मला झाशीची राणी लढताना दिसेल! राजयोगी अशोक राज्य करताना दिसेल! होमरनेच ईलियड रचले का, त्याचा निर्णय करता येईल! तुमच्याही पलीकडच्या तार्‍यांवर आताच पोचलेल्या किरणांत आर्य लोक आर्यावर्तात केव्हा आले ते बघता येईल! आणखी पलीकडच्या तार्‍यांवर या पृथ्वीवरील प्रभावाची नि प्रलयाची चित्रं नुकतीच पोचली असतील!…. सप्तर्षींनो आणखी पलीकडे किती जाणार? भूतकाळ भूतभूतकाळ असा माग काढीत किती अनंत खोल जाणार? शेवटी इतिहासाचा प्रारंभ कधीच पाहता येणार नाही-
इतिहासाचे पहिले पान न मिळते कधी पहायाते
आरंभ तुझा दुसर्‍या पानापासूनि शाप हा याते”(आर्या,२१७)
आधुनिक युगातील ‘हिंदुत्वा’चे पहिले तर्कशुद्ध, बुद्धिवादी, वस्तुनिष्ठ आणि राष्ट्रवादी भाष्यकार सावरकर इथे कवितेचा कवचमंत्र म्हणून उपयोग करताना आपली जीवनदृष्टी किती व्यापक करतात, हे वरील उदाहरणांवरून स्पष्ट दिसते.

 

 

व. दि. कुलकर्णी यांनी सावरकरांच्या संदर्भात ‘आत्मबल’ एका नव्या काव्य प्रयोजनाचा शोध लावला आणि त्या संदर्भात विवेचन केले ते मराठी काव्याच्या आणि समीक्षेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
“अनादि मी अनंत मी अवध्य मी भला
मारिल रिपु जगति असा कवन जन्मला…
…अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिऊनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो…” (आत्मबल)
अशाप्रकारे ते काव्यभिव्यक्तीच्या आधारे मृत्यूवर जय मिळविण्याच्या प्रयत्नात दिसतात. काव्यविषयीची त्यांची कल्पना आणि त्यातील दोन रूपांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन ‘मूर्ति दुजी ती!’ या कवितेतून स्पष्टपणे दृग्गोचर होतो.
“ना! कविता निजभक्ता त्यागिना कधी!
भक्ता तिला त्यागो, ती त्यागिना तया!
कारण की मूर्ति तिच्या असति दोन ज्या
कर्तव्या अनुसरूनी रक्षिती तिच्या
पूजकासि वा प्रियासि समयि विभिन्ना
एक मूर्ति तीः नाचत हृदमंचकी
रसिक मनाची वीणा घेऊनी करी…
…. आणि दुजी ती : मूर्ति प्रखर जी तुझी
कविते घेऊनि शिरे वाण सतीचे.”
यात २० मात्रांचे वैनायक वृत्त कवीने प्रथमच वापरले. आपली काव्यलेखनामागची भूमिका मांडताना त्याचे प्रयोजन आणि प्रेरणा दोन्ही कशी भारतभूमीशी निगडित आहे, हे दिसून येते.
“हे मातृभूमि! तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले
तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला
लेखाप्रती विषय तूचि अनन्य झाला.”

 

 

सावरकरांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची कविता यांच्या अनुबंधाचा विचार महत्त्वाचा ठरतो. तसे पाहता सावरकरांचे उत्तुंग व्यक्तित्व केवळ कवितेत सामावणारे नाही. त्यामुळे ते सामग्य्राने कवितेत येत नाही. ते इतर साहित्यातून, लेखातून, भाषणांतून, त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यातूनही तितकेच प्रखरपणे प्रतिबिंबित होते. काही कवींचे समग्र व्यक्तिमत्त्वच जसे कवितेत सामावू शकते उदा. केशवसुत, तसे सावरकरांचे म्हणता येत नाही. केशवसुत जसे केवळ ‘कवींचं’ आहेत तसे सावरकर केवळ ‘कवींच फक्त नाहीत. जसे ज्ञानदेव-तुकाराम हे केवळ कवीच नाहीत, तर त्यापेक्षा कितीतरी अधिक काही आहेत. म्हणजे कवितेहून मोठी अशी ही व्यक्तित्वे आहेत. कारागृहात असताना देशभक्तांनी मोठमोठे वैचारिक ग्रंथ लिहिल्याचा इतिहास आहे. लोकमान्यांचा ‘श्रीमदभगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ किंवा नेहरूंचे “Glimpses of world History’ आणि `Discovery of india’ ही त्याची काही उदाहरणे. परंतु , सावरकरांचा कारावास यास अपवादभूत. तिथे कागद, पेन्सिलीचा तुकडा जरी सापडला तरी कठोर शिक्षा व्हायची. त्यामुळे कोठडीच्या भिंतीचे कागद आणि काट्यांच्या लेखण्या. कोठडीला रंग देण्याची व कोठडी बदलण्याची वेळ होण्याआधी लिहिलेले पाठांतर करून ठेवावे मग ते कुणाच्या तरी माध्यमातून बाहेर जाणार. कवितानिर्मितीची ही खडतर प्रक्रिया केवळ मराठीच नव्हे, तर जागतिक वाङ्मयातही एकमेवाद्वितीय अशी ठरते. ‘स्व’च्या आधाराचे एक साधन बनते कविता. सावरकरांच्या तुरुंगातील कारावासाचा आणि तुरुंगाबाहेरील स्थानबद्धरूपातील बंदिवासाचा कालखंड पाहिला तर तो तब्बल २७ वर्षांचा भरतो. १९११ ते १९३७. १४ वर्षे कारावास व १३ वर्षे रत्नागिरीला स्थानबद्धता. ४ जुलै १९११ ते २ मे १९२१ ते अंदमानात होते. पुढे १९२१ ते १९२४ एरवडा तुरुंगात आणि पुढे १९२४ ते १९३७ रत्नागिरीला स्थानबद्ध. सावरकरांच्या असामान्य व्यक्तिमत्वाविषयी – ‘सावरकर : एक रहस्य’ या चरित्रग्रंथात द. न. गोखले यांनी विविध प्रेरक शक्तींचे विवेचन केलेले दिसते. त्यात १)आत्मसमर्पण (देशाला वाहिलेली प्रेरणा), २)आत्मप्रस्थापना, ३) कर्तव्य, ४) संघर्ष-युद्ध, ५) धैर्य (शारीरिक व मानसिक), ६) जिज्ञासा-व्यासंग, ७) प्रज्ञा आणि प्रतिभा (मनःशक्ती), ८) विपुल ऊर्जा-जीवशक्ती, ९) अतिप्रवणता (प्रत्येक गोष्टीत उत्कर्षाकडे जाण्याचा प्रयत्न त्यामुळे प्रखर, एकांगी, अतिरेकी स्वरूप) या गोष्टींचा सोदाहरण निर्देश केलेला आहे. या अशा पृथगात्म व्यक्तिमत्त्वाचे मूर्तीकरण ठरणारी त्यांची कविता मराठी देशभक्तिपर काव्यातच नव्हे, तर संपूर्ण भारतीय राष्ट्रीय वाङ्यमात उठून दिसते. निराला, पंत, महादेवी, मैथिलीशरण गुप्त, माखनलाल चतुर्वेदी, रवींद्रनाथ, सुब्रह्मण्यम भारती आदी भारतीय राष्ट्रीय कवींच्या मांदियाळीत सावरकर हे आत्मप्रत्ययाच्या प्रखर झळाळीमुळे व प्रतिभाशक्तीच्या उत्तुंग भरारीमुळे वेगळेपणाने उठून दिसतात. अनन्य देशभक्तिपर जाणिवांचे दर्शन घडविणारी त्यांची कविता त्यांच्या भव्य-दिव्य अशा जीवननाट्याशी समरस होत, त्यातून चैतन्यरस ग्रहण करीत विलक्षण ताजी, टवटवीत, तेजस्वी बनते. एखाद्या महाकाव्याच्या धीरोदात्त नायकाप्रमाणे जीवन लाभलेले सावरकर. या सर्व खडतर अशा जीवननाट्याची पूर्णपणे जाणीव बाळगणारे सावरकर. आपल्या क्रांतिकारक मित्रांना इंग्लंडच्या तुरुंगातून काव्यरूप निरोप पाठवताना ते म्हणतात- “Farwell oh lovinmg Friends, farewell… आमुचा रामराम घ्यावा… मित्रांनो! परमेश्वराने दिलेल्या भूमिका पार पाडण्यासाठी आपण दूर दूर जात आहोत- पण या ईश्वरी नाटकाच्या भरतवाक्याच्या वेळी आपण सर्व रंगमंचावर पुन्हा एकत्र येऊ- तोवर मित्रांनो रामराम- माझा अंत होऊन माझ्या अस्थी माझी राख कदाचित अंदमानच्या एखाद्या नदीनाल्यात, कदाचित गंगेच्या स्फटिकशुभ्र पाण्यात पडून राहील-आणि एक दिवस असा उजाडेल तेव्हा भारतवर्षाचे पारतंत्र्य संपलेले आहे! मानवजातीच्या प्रगतिपथावरील दीपस्तंभ म्हणून भारतवर्ष उभा आहे! दुष्टांचे निदार्लन झाले असून सज्जनांचा जय झाला आहे- हुतात्म्यांनो उठा! रणांगणावर लढत पडलेल्या वीरवरांनो उठा! संसाराच्या सहाणेवर झिजत नष्ट झालेल्या संतांनो उठा- म्हणून घनःश्याम श्रीराम तुतारी फुंकील! तेव्हा माझ्या अस्थी नि माझी राख कदाचित पुन्हा चैतन्याने उसळून उठेल! तोवर मित्रांनो रामराम!”(समग्र सावरकर)

 

भारत देशाविषयी आणि इथल्या संस्कृतिविषयी कविमनाची जी अतूट सायुज्यता आहे ती अपूर्व आहे. ती काव्यातून इतक्या सहजपणे झरते की काहीशा संस्कृतप्रचुर, वृत्तबद्ध शैलीतूनही ती रसिकहृदयापर्यंंत पोचून त्यास अंतरंगातून हलवून सोडते.
“नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा। मज भरत भूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी। आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मजप्रिय साचा। वनवास तिच्या जरि वनिचा” (सागरास)
कवीच्या जीवनिष्ठांच्या संदर्भात विचार करता राष्ट्रनिष्ठा आणि हिंदुत्वनिष्ठा या दोन निष्ठा त्यांच्या काव्यलेखनाच्या केंद्रस्थानी दिसतात. सावरकरांनी एकीकडे इतिहासलेखन केले तर दुसरीकडे काव्यलेखन. त्यामुळे त्यांचे एकमेकांत मिसळणे स्वाभाविकच होते. इतिहासलेखनात काव्यात्मता आणि कल्पनाविलास दिसतो, तर काव्यात ऐतिहासिक घटना- प्रसंगांचे दर्शन होते. हिंदू संस्कृतीच्या प्राचीन पुण्यप्रवाहाचे सतत वर्णन, भारतीय अथवा देशी जीवनमूल्यांचा सतत पुरस्कार आणि भारतीय इतिहासातील वीर पुरुषांचे निरंतर स्मरण कवितांच्या ओळीओळीतून घडत जाते. भूमीशी, देशाशी, संस्कृतीशी, इतिहासाशी, परंपरेशी इतके एकरूप झालेले कविमन मराठी साहित्यात अपवादात्मक. त्यामुळे ही कविता शैलीच्या अंगाने एखादवेळी क्लिष्ट-कृत्रिम वाटली तरी आशयाच्या अंगाने जिवंत, जोमदार, प्रामाणिक, सच्ची आणि भावपूर्ण वाटते. अंततोगत्वा सावरकरांची कविता हा भावकवितेचा एक उत्तम आणि गुणवान नमुना ठरते. या कविता गेल्या शतकाच्या प्रारंभापासून आजवर १०० वर्षानंतरही भारतीय माणसाला प्रेरक ठरतात. ही प्रेरक शक्ती, ही आवाहनक्षमता आणि संवादक्षमता सावरकरांच्या शब्दात कुठून येते? ती येते, स्वातंत्र्यवीरांच्या व्यक्तित्वातून. म्हणून सावरकरांशी वैचारिक पातळीवर मतभेद दर्शविणार्‍या समीक्षकांनीसुद्धा त्यांच्या काव्यातील देशभक्तिपर जाणिवांच्या प्रभावी अभिव्यक्तीचा गौरवच केलेला दिसतो. डॉ. अक्षयकुमार काळे (अर्वाचीन मराठी काव्यदर्शन), डॉ. यशवंत मनोहर (मराठी कविता आणि सामाजिकता), वसंत आबाजी डहाके (प्रस्तावना, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश), डॉ. हरिश्चंद्र थोरात (साहित्याचे संदर्भ) इत्यादींच्या लेखनात सावरकरांच्या उत्तुंग व्यक्तित्वाविषयीचा आणि कर्तृत्वाविषयीचा आदरच व्यक्त झाला आहे.

या विवेचनाच्या पार्श्वभूमीवर सावरकरांच्या दोन प्रसिद्ध भावकवितांचे विश्लेषण मांडून लेख पूर्णत्वाकडे न्यायचा आहे.
भावकाव्याचा सर्वोत्तम नमुना ठरू शकेल अशी सावरकरांची रचना म्हणजे ‘सागरास.’ हृदयनाथांनी संगीतबद्ध व लताबाईंनी स्वरबद्ध केल्यामुळे ही कविता मराठी रसिकांच्या सतत तोंडी खेळते. ‘ने मजसि ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला’ या पहिल्या चरणानेच ती मराठी मनाला परिचित आहे. समुद्रकिनार्‍यावर मातृवियोगाने, स्वजनांच्या वियोगाने व्याकुळ होऊन अश्रू ढाळत ही रचना बाहेर पडली असे सांगितले जाते. ‘अक्रूर’ या प्रसिद्ध अर्धसमजाति पद्मावर्तनी वृत्तात ही रचना असून तिच्या चालीस ‘पाळणागीता’चा आकृतिबंध लाभला आहे. दत्तांची ‘बा नीज गडे’ किंवा गोविंदाग्रजांची ‘गुणी बाळ असा…’ या रचना प्रसिद्ध आहेत. ही कविता मातृवियोगाची, मातेशी व तिच्या बाळाशी संबंधित, वत्सलभावाची व करुण रसाची कविता आहे. त्यामुळेच तिला हा छंद स्वाभाविक प्राप्त झालेला दिसतो. छंद-वृत्तांवर अचूक प्रभुत्व असणारा कवी गात गातच कवितेला जन्म देताना दिसतो. ‘सागरा प्राण तळमळला’ हे धृवपद खरेतर ह्या कवितेचंच केवळ ध्रुवपद नाही, तर ते सावरकरांच्या संपूर्ण काव्यसंभाराचेच ध्रुवपद आहे, कारण सारीच कविता तळमळणार्‍या प्राणातून उगम पावलेली आहे. इंग्लंड मध्ये असताना १९०९ साली झालेली ही रचना आजही अम्लान आणि भावपूर्ण वाटते. त्यांची दुसरी खूप गाजलेली काव्यरचना म्हणजे ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र.’ १९०३ मध्ये पुणे येथील आपल्या कार्यकाळाच्या प्रारंभी लिहिलेली ही कविता. सावरकरांचा जन्म १८८३ चा. म्हणजे वयाच्या केवळ २० व्या वर्षीची ही रचना. देशभक्तिपर काव्यप्रवाहातील हे एक अजरामर गीत आहे. देशप्रेमातून सहज उगवणारी मातृभूमीच्या मुक्तीची- स्वातंत्र्याची तीव्र लालसा या गीतात आहे. जोपर्यंत या जगात मराठी भाषा जिवंत आहे आणि देशभक्तीची जाणीव माणसाच्या मनात तेवत आहे तोपर्यंत ही कविता अमर आहे. कालातीत, कालनिरपेक्ष अशी संवादक्षमता आणि आवाहनक्षमता तिच्यात आहे. विविध विचारप्रणाली आणि पक्षोपपक्षांच्या मंडळींना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य या काव्यकृतीत आहे. एक कलाकृती म्हणून कुठल्याही आस्तिक भारतीयाला भावेल अशी ही रचना. यात ते स्वतंत्रतेची भगवती-देवी म्हणून प्रार्थना करतात. एक कविता म्हणून तिचे मूल्यांकन करायला लागलो तर तिच्यातला भावनांचा उद्रेक पाहता‘भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार’ ही काव्याची व्याख्या तिच्यातून साक्षात मूर्तिमान होताना दिसते. तिच्यातील गतिमानता, एकामागोमाग एक अत्यंत चपखलपणे येणार्‍या प्रतिमा-प्रतीके, आशयाला लगडून येणारी लय, उत्तुंग कल्पनाशीलता अशा अनेक वाङ्मयगुणांनी ती युक्त आहे. सावरकर आत्मानुभवी क्रांतिवीर देशभक्त आहेतच, पण त्यांच्यातला संवेदनशील सौंदर्यासक्त कलावंत सतत जागा असतो. म्हणून मग ‘गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली’ सारखी कोमल-हळुवार अनुभूती ते व्यक्त करतात. ज्याप्रमाणे ज्ञानदेवांची प्रतिभा संतत्वाच्या आणि तत्त्वज्ञाच्या व्यक्तित्वातही सौंदर्यपूर्ण व तरल राहते तसेच या कवितेतून दिसून येते. हृदयनाथ मंगेशकरांनी मराठी रसिकांच्या हृदयात पेरलेले या कवितेचे गीतरूप आज बहुधा आपल्या मनात आहे. मूळातली ही एक सर्वांगसुंदर भावकविता. गीत आणि भावकाव्याच्या सीमारेषेवर झुलणारी. हृदयनाथ तिचे रूपांतर एका राष्ट्रभक्तिपर संचलन गीतात करतात. संघाच्या घोषावर जेव्हा तिचे शब्द वातावरणात पसरतात आणि स्वयंसेवकांच्या लयबद्ध पावलांमध्ये ज्या वेळी ती गती भरताना दिसते, तेव्हा या गोष्टीचा प्रत्यय येतो. जेव्हा स्वतंत्रतेला भगवती असे ते कल्पितात तेव्हा मातृभूमीला दुर्गा संबोधणारे बंकिमबाबू आपल्याला आठवतात.‘हे अधमरक्तरंजिते सुजन पूजिते’ चे साम्य ‘बहुबल धारिणीम, नमामितारीणीम् रिपुदलवारीणिम्’शी असल्याचे लक्षात येते. या स्वातंत्र्यदेवीसाठी कविवीर आणि वीरकवी सावरकर विविध प्रतिमाने अगदी सहजपणे वापरतात. परवशतेच्या नभात लखलखणारी चांदणी, सुंदर स्त्रीच्या गुलाबी गालावरची लाली, कोवळ्या फुलांची सुकुमार कोवळीक, सूर्याचे तेज, सागराचे गांभीर्य, मोक्ष-मुक्ती, अधमरक्तरंजिता, सुजनपूजिता, इत्यादी. या कवितेची तुलना भारतीय काव्यात केवळ ‘वंदे मातरम्’शी होऊ शकते. अशी काव्ये साक्षात्काराप्रमाणे असतात. विविध मानवी जीवनमूल्यांचे साकार रूप असणारे सावरकरांसारखे असामान्य आत्मेच अशा कलाकृती जन्माला घालू शकतात. त्यांच्यासारखे महान आत्मे आपल्या अवतीभवती पृथ्वीतलावर प्रत्यक्ष वावरतात हे आपलं भाग्यच. हेच भाग्य खरेतर अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरक व्यक्तित्वाचा आणि कवित्वाचा पुनरानुभव घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.
( मराठी काव्यधारा : स्पंद आणि छंद, लाखे प्रकाशन, नागपूर २०१५ या पूर्वप्रसिद्ध ग्रंथात समाविष्ट.)
[सोबतचे चित्र : १०वीत शिकत असताना लेखकाने काढलेले.)