किंकाळ्या आणि जखमींचे विव्हळणे… मृतांचा आकडा 233 वर, 900 वर जखमी

0

बालासोर : ओडिशातील बालासोर येथे काल संध्याकाळी झालेल्या रेल्वेगाड्यांच्या अत्यंत भीषण अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली असून 900 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ काल सायंकाळी हा अपघात झाला आहे. जखमीवर जवळपासच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मदतकार्य वेगाने सुरू असून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेस लगतच्या ट्रॅकवरील मालगाडीला धडकली. त्यामुळे या अपघाताची व्याप्ती वाढली. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसऱ्या रेल्वे मार्गावर पसरले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस या डब्यांवर धडकली. त्यामुळे कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसऱ्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वरही चढल्याचे भीषण दृष्य अपघातस्तळी दिसून आले.
या अपघातातील मृतांची संख्या २३३ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत.

शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफच्या चार तुकड्या, 30 डॉक्टर, 200 पोलीस कर्मचारी आणि 60 रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. ओडिशा सरकारचे काही मंत्री काल रात्रीच अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले होते. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर गंभीर जखमींना 2 लाखांचे सहाय्य केलं जाणार आहे.

भयावह परिस्थिती

बालसोरमधील बहनागा बाजार स्टेशनचा परिसरात काल रात्रीपर्यंत किंकाळ्या, हुंदके, जखमींचे विव्हळणे ऐकू येत होते. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर केला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.