नागपूर : स्वयंपाकात पारंगत असलेल्या गृहिणींना असाच एखादा प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज आहे. सर्वांनाच तो मिळत नाही. ‘शंखनाद’ न्यूज चॅनेल, पोर्टलच्या वतीने आयोजित पाककला स्पर्धेच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असा सूर विविध मान्यवरांनी आज बोलून दाखविला. बोखारा येथील तुली काॅलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सभागृहात आयोजित या विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेचे उदघाटन शनिवारी सकाळी झाले. प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी नगरसेविका प्रगतीताई पाटील, तुली काॅलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या संचालिका उर्वशी यशराॅय, प्रवीण राठी, आरतीताई वाघमारे, कीर्तीताई जांभुळकर, निरज जैन, शंखनाद खाद्ययात्रा मालिका आणि या स्पर्धेच्या समन्वयक, नागपूरच्या सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर आणि शंखनादचे संपादक सुनील कुहीकर, संचालिका राखी कुहीकर, पितांबरीचे भूषण कोहळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या डायरेक्टर उर्वशी यशराॅय यांनी गृहिणींना असा प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज आहे. सर्वांनाच तो मिळत नाही असे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नगरसेविका प्रगतीताई पाटील म्हणाल्या, प्रत्येकामध्ये एक वेगळी प्रतिभा असते या प्रतिभेला यानिमित्ताने शंखनादने चांगली संधी उपलब्ध करून दिली. (Housewives who are good at cooking need to have such a platform. Not everyone gets it. Various dignitaries expressed today that a big platform has been made available through the cooking competition organized by ‘Shanknaad’ news channel, portal.)
पुढल्यावेळी मला पण स्पर्धक म्हणून सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. महिलांच्या विविध प्रश्नांना शंखनाद न्यूज चॅनल, पोर्टलच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाघमारे मसालेच्या आरती वाघमारे म्हणाल्या, आज प्रेझेंटेशनला महत्त्व आले आहे. कुकिंग ही एक मोठी कला असून, महिलांसोबतच पुरुषही हिरिरीने यात सहभागी झालेत ही चांगली गोष्ट आहे. शंखनाद न्यूज चॅनलचे संपादक सुनील कुहीकर यांनी यावेळी लोकसहभागाशिवाय कुठलाही उपक्रम यशस्वी होत नाही यावर भर दिला. गेल्या दोन वर्षात शंखनाद न्यूज चॅनेल आणि पोर्टलला सर्व घटकातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या पुढील काळातही केवळ बातम्या न देता शंखनाद परिवार समाज घडविण्यासाठी कार्यरत राहील असा विश्वास दिला. दरम्यान, या स्पर्धेच्या समन्वयक प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी स्पर्धेविषयीची सविस्तर माहिती दिली. वेळोवेळी संवाद साधत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. यानिमित्ताने उत्तमोत्तम पाककृती पाहायला मिळाल्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिक देखील सहभागी झाले याचा आनंद त्यांनी यावेळी बोलून दाखविला. संचालन चंद्रपूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी सुशील सहारे यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध शेफ पूनम राठी, देवल येळणे, मंजुषा देशपांडे, विशाल चवरे, मधुरिका चौधरी, रिझवाना दिवाण यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शंखनाद न्यूज चॅनलचे व्यवसाय व्यवस्थापक विनोद अंभोरे, मुख्य वार्ताहर सनी भोंगाडे, प्रशासकीय अधिकारी मीनल चतुरपाळे, ज्येष्ठ रंगकर्मी सुशील सहारे, पंकज मलिक, मयुरेश गोखले, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार, प्रवीण दुपारे, कुणाल मंचलवार, अनुष्का काळे, आशीष उके, प्रियंका ठाकरे, माला दोडके आदी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.