
मुंबईः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. यापुढेही आपण अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहोत, अशी घोषणा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत (NCP President Sharad Pawar) केली. पक्षाच्या राष्ट्रीय निवड समितीच्या शुक्रवारी सकाळी झालेल्या बैठकीत पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला होता. त्यानंतर समितीतील नेत्यांनी पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे व त्यासाठी पक्षात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा करताना पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी सर्व जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी इच्छा होती. मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसात तीव्र भावना निर्माण झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते माझे सहकारी अस्वस्थ झाले होते. मी या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे हितचिंतक, माझ्यावर विश्वास असलेले कार्यकर्ते, असंख्य चाहते एकमुखाने मागणी केली. महाराष्ट्रातील निरनिराळे कार्यकर्ते यांनी अध्यक्ष राहावे अशी त्यांनी आग्रही विनंती केली. “लोक माझे सांगाती” हेच माझ्या समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. मी या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने तसेच देशातून विविध पक्षांच्या नेत्यांकडून आलेली आवाहने, या सर्वांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे” असे पवारांनी यावेळी स्पष्ट केले.