नागपूर NAGPUR : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा SHRAD PAWAR शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. राजीनामास्त्र उपसून शरद पवारांनी नेमके काय साध्य केले?..सध्या याच प्रश्नाची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. शरद पवारांची कुठलीही कृती सहज, साधी, सोपी नसते, असे पवारांबद्धल सातत्याने सांगितले जाते. त्याची प्रचिती त्यांच्या राजीनामानाट्याने पुन्हा एकदा आली आहे. या नाट्याची पटकथा स्वतः पवारांनीच एकट्याने लिहिली असावी, असे समजायला आता वाव आहे. पक्षावर पकड मिळविण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीतील गटाची पवारांच्या राजीनामास्त्राने पुरती गोची झाल्याचे चित्र आहे. आणखी स्पष्ट शब्दात नमूद करायचे झाल्यास पक्षांतर्गत वर्चस्वाच्या या लढाईत काकांनी पुतण्याला धोबीपछाड दिल्याचे आणि पक्षावरील पकड अधिक बळकट केल्याचे वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे.
राष्ट्रवादीतील मोठा गट अजित पवारांच्या नेतृत्वात वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या मागील काही महिन्यांपासून सुरु आहेत. अजित पवार नॉट रिचेबल झाल्याच्या प्रकरणापासून या चर्चांना जोर चढला होता. स्वतः अजित पवारांनी त्यात तथ्य नसल्याचा दावा जरी केला असला तरी प्रत्यक्षात एक मोठा गट त्यांच्या विचारांनी वाटचाल करायला तयार असल्याचे चित्रही निर्माण झाले होते. शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी हे उघड्या डोळ्यांनी मान्य तरी कसे करणार? आपल्या नेहमीच्या गूढ शैलीप्रमाणे पवारांनी राजीनाम्याचा डाव टाकला. आपण राजीनामा देणार असल्याची पुर्वकल्पना त्यांनी सुप्रिया सुळे व अजित पवारांना दिली खरी पण, या राजीनाम्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? याची कल्पना देखील अजित पवारांनी कदाचित केलेली नसावी. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी नेते व कार्यकर्त्यांची आंदोलने सुरु झाली. “पक्षाला नवा अध्यक्ष मिळाला तर तुम्हाला काय अडचण आहे?…” असा प्रश्न अजितदादा जाहीरपणे आंदोलन करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना विचारताना दिसले. तर दुसरीकडे शरद पवारांच्या समर्थनात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सक्रिय झाले. नेते व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सुरु झाले. वाय.बी. सेंटरपुढे कार्यकर्त्यांची आक्रमक आंदोलने सुरु झाली.
राष्ट्रवादीतील या घडामोडींची राष्ट्रीय स्तरावरही या घडामोडीची गंभीर दखल घेतली गेली. विरोधी पक्षाच्या गोटात यामुळे खळबळ माजली. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष असला तरी राहुल गांधी, स्टॅलिन व इतर काही नेत्यांना त्याची दखल घेणे भाग पडले. शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, यासाठी सुप्रिया सुळेंकडे आग्रह धरण्यात आला. या साऱ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादीच्या समितीने एकमुखाने शरद पवारांचा राजीनामा फेटाळणे अगदी अपेक्षितच होते. अगदी अजित पवार गोटातील नेत्यांच्या तोंडूनही ते वदविले गेले. पक्षनेते व कार्यकर्त्यांचा तसेच इतर पक्षातील नेत्यांकडून आलेल्या विनंतीचा मान करून आपण राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा पवारांनी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त जल्लोष करून या निर्णायाचे स्वागत केले. या राजीनामास्त्राने पवारांनी पक्षांतर्गत संदेश द्यायचा तो दिलाच. शिवाय, सध्याच्या राष्ट्रीय राजकारणात आपले महत्व कुठेही कमी करता येणार नाही, हे देखील पवारांनी या राजीनामानाट्यातून अधोरेखित केले. यात महत्वाचे म्हणजे शरद पवारांनी उत्तराधिकारी नेमणार असल्याचे जाहीर करून गाजर पुढे केले आहे. त्यामुळे पक्षाला वेगळ्या वाटेनं नेण्याच्या कुणी फंदात पडणार नाही, याची काळजी पवारांनी यानिमित्ताने घेतल्याचे जाणकरांना वाटते.