
मुंबई Mumbai -राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर अजित पवार गटातील नेते आणि मंत्र्यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन समेटाचा प्रयत्न केला. मात्र, शरद पवारांनी हा प्रस्ताव सपशेल फेटाळून भाजपसोबत कदापिही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवार गटाने काल वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समेटाचा प्रस्ताव ठेवला होता. शरद पवार हे काल नियमित कामकाजासाठी प्रतिष्ठानमध्ये आले होते. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेही होत्या. अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेते यावेळी दाखल झाले. त्यांनी यावेळी शरद पवारांना नमस्कार करून त्यांच्याशी चर्चा केली. खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ आदी मंडळी यावेळी होती. मात्र, शरद पवार यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
पटेल यांनी सांगितले की, राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहील यासाठी शरद पवारांनी मार्गदर्शन करावे आणि एकत्र काम करूया अशी विनंतीही शरद पवारांना केली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन करून बोलवून घेतले. यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांची नंतर बैठकही झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, आम्ही सरकारला समर्थन दिलेले नाही. त्यामुळे तशाच प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी आमच्या बसण्याची व्यवस्था करावी, असे सांगण्यात आले आहे.