खासदार संजय राऊतांना त्यांच्याच माणसाकडून ‘खोट्या’ धमक्या

0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी त्यांचा निकटवर्तीय मयूर शिंदे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने संजय राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी हा बनाव रचल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. मागील आठवड्यात संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याने सुनील राऊत यांना फोन केला होता. संजय राऊत यांना तोंड बंद ठेवायला सांगा, नाही तर तुम्हाला दोघांनाही गोळ्या घालू, या शब्दात धमकावण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मयूर शिंदेसह चौघा जणांना अटक केली आहे. आता संजय राऊत यावर काय बोलतात, याकडे लक्ष लागलेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांचा निकटवर्तीय असलेल्या मयूर शिंदे याने स्वतः सुनील राऊत यांना फोन केलेला नव्हता तर त्याने हे सर्व घडवून आणले. मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
राजकारणी की गँगस्टर
दरम्यान, या प्रकारावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत बंधूंवर निशाणा साधला. आपल्यावर हल्ला करणारा व्यक्ती देखील संजय आणि सुनील राऊत यांच्या जवळची आहे. राऊत बंधू हे राजकारणी आहेत की गँगस्टर आहेत? हा प्रश्न उपस्थित होतो. धमकीचा बनाव रचण्यासाठी राऊत बंधूंनी मयुर शिंदेचा वापर केला, असेही मनसेने म्हटले आहे.