मुंबई : मुंबईत आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाली असून शिवसेनेच्या वतीने ठाकरे गटासह सर्व आमदारांसाठी व्हिप काढण्यात आल्याने वातावरण (Shiv Sena issues Whip to all MLA`s for Assembly session ) तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला व्हिप बजावण्यास व कारवाई करण्यास मनाई केले असल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याचा इशारा ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दिलाय. तर अशा व्हिपला आम्ही भीक घालत नाही, असे विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हिप बजावला आहे. हा व्हिप अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भात बजावला असून आम्ही कुणावरही कारवाई करत नाही तर सध्या फक्त अधिवेशनाला पूर्णवेळ हजर राहण्यासंदर्भात व्हिप बजावला आहे. कारवाईसंबंधीचा विचार दोन आठवड्यांनी करु, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.
शिंदे गटाच्या या कृतीमुळे ठाकरे गट संतापला असून आज ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सांगितले की, न्यायालयात मान्य करुनही त्यांनी व्हिप काढला आहे. त्यामुळे पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तर व्हिपने कुणी घाबरवत असेल तर मी भीक घालत नाही. आमचे घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमचे संरक्षण काढले तरी आम्ही डगमगलो नाही तर व्हिपचे काय घेऊन बसलात, असे जाधव म्हणाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या वादात आणखी एकाची भर पडली आहे.