मित्रासह झाडाच्या फांदीला लावला गळफास : चंद्रपुरात खळबळ
चंद्रपूर. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (Hansraj Ahir, Chairman, National Commission for Backward Classes ) आणि त्यांच्या कुटुंबावर नजिकच्या काळात दुसऱ्यांदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे लहान बंधून हितेंद्र अहीर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. हितेंद्र यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर अहीर यांनी निष्काळजीपणाचा आरोप करीत तक्रारही दाखल केली आहे. या दुःखद घटनेतून अहीर कुटुंब सावरत असतानाच अहिर कुटुंबाला धक्का देणारी घटना उघडकीस आली आहे. हंसराज अहिर यांचा पुतण्या महेश अहीर याने चंडीगड येथे मित्रासोबत एकत्र आत्महत्या (Committed suicide together with a friend in Chandigarh ) केली. दोघांनीही झाडाच्या एकाच फांदीला गळफास लावून जीवन संपविले. ही घटना उघडकीस आल्यापासून चंद्रपुरात खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
महेश अहीर (२४) रा. कोतवाली वॉर्ड, जलनगर, चंद्रपूर आणि हरिश प्रदीप धोटे (२७) रा. बालाजी वॉर्ड, चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही जीवलग मित्र होते. दोघांचेही मृतदेह चंडीगडच्या सेक्टर ४३ मधील बसस्थानकासमोरील जंगलात एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी याबाबत चंदिगढ सेक्टर 36 च्या पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केला, मृतकांमध्ये महेश अहिर व हरीश धोटे यांचा समावेश होता. गेल्या काही दिवसांपूर्वी ते दोघेही कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. १५ मार्चला ते बेपत्ता असल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलिसात अहिर कुटुंबाने नोंदविली होती. मात्र अचानक अशी घटना घडल्याने अहिर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन साठी पाठविले.
आत्महत्या की घातपात?
दोघेही बेपत्ता असले तरी समाजमाध्यमावर त्यांचे फोटो दिसत होते. दोघेही आनंदी आणि हसत खेळत असल्याचेही दिसून येते. परिस्थितीजन्य पुराव्यावरून ही आत्महत्याच असल्याचा स्थानिक पोलिसांचा दावा आहे. पण, आत्महत्ये मागील कारण काय, ते कळायला कोणहाती मार्ग नाही. यामुळे हत्येचीही शंका व्यक्त केली जात आहे. तुर्त शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात असून त्यातूनच बरेच काही स्पष्ट होऊन तपासाची दिशाही निश्चित होऊ शकेल.