नागपूर: समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या निमित्ताने या मुद्यावर देशभर चर्चा सुरु असताना नागपुरात एक धक्कादायक घटना उघकीस आली आहे. आपण लेस्बियन असल्याचा दावा करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली. ही युवती बी.एस. द्वितीय वर्षाला नागपुरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती. लेस्बियन असल्याने लग्नात अडचणी येण्याची व समाजाकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. गळफास घेण्यापूर्वी युवतीने चिठ्ठी लिहून ठेवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीचे कुटुंब मूळ उत्तर प्रदेशातील असून ते नागपुरात अनेक वर्षांपासून राहते. आपण समलैंगिक असल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने याबाबत कुटुंबीयांना कल्पना दिली. त्यावेळी तिच्या आईवडीलांना मोठा धक्का बसला. तेव्हापासून कुटुंबातील लोक तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असायचे. तिची समजूत घालण्याचे प्रयत्नही करण्यात आले. पण, त्याचा उपयोग झाला नाही.
नेमके काय कारण
अलिकडे कुटुंबीयांनी तिच्यावर लग्नासाठी दबावही टाकला होता. रविवारी दुपारी तिचे आईवडील व भाऊ बाहेर गेले होते. तनिष्काने छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतला. कुटुंबीय घरी आल्यावर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी तिला तातडीने मेयो इस्पितळात नेले. तोवर उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तिने चिठ्ठी लिहून ठेवलेली होती. त्यात तिने लेस्बियन असल्याने तिचे कुटुंबीय तसेच समाज तिला विरोध करत असल्याचे नमूद केले. स्वत:च्या इच्छेनुसार जीवन जगता येत नसल्याने हे कठोर पाऊल उचलत असल्याचे तिने नमूद केले. आपल्या कृत्याबद्दल तिच्या पालकांची माफीदेखील मागितली.