“अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा…आम्ही मुख्यमंत्रीच बदलला!…”

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर तुफान टोलेबाजी


नागपूर: विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. “हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा, असा टोमणा मला मारण्यात आला होता. मग मी म्हणतो अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. लोकांचं हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला, सरकारच बदलले”, या शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोले लगावले. अडीच वर्षांत तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना राष्ट्रवादीची झाली म्हणून आम्ही बाहेर पडलो. रोज आरोप करतात. रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्यांना तुम्ही आव्हानन देता पण राज्यात कोव्हीडचे संकट असताना आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना दिलासा दिला, या शब्दात शिंदे यांनी विरोधकांना सुनावले.
मुख्यमंत्री म्हणाले, जयंत पाटील सभागृहात नाहीत. पण ते बरोबर बोलत होते. राष्ट्रवादीची शिवसेना म्हणाले ते. ते योग्यच बोलले. आम्ही पण तेच सांगत होतो. त्यामुळेच आम्ही बाहेर पडलो. बाप चोरला वगैरे म्हणत आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला पितृतुल्यच आहेत. विचार चोरले म्हणता? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकले, ते आमच्याविरोधात कसे काय बोलू शकतात? बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.रोज एवढी जळजळ, मळमळ होणे बरोबर नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
आम्ही वर्षा वर नंतर गेलो तर तिकडे पाटीभर लिंब सापडली. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूची भाषा करु लागले. रेशीम बागेत गेल्यानंतर अनेकांनी आम्हाला हिणवले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे काम करायचे म्हणून आम्ही रेशीमबागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आजही मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसलं? बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले, त्यांनी सांगायची गरज नाही. हिऱ्याच्या पोटी गारगोटी!.. या शब्दात शिंदे यांनी टोला लगावला.
अजित पवारांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, “दादा, तुम्ही आम्हाला सांगता की सत्तेची मस्ती नसावी. तुमच्या काळात हनुमान चालिसा वाचायला बसलेल्या आमदाराला व त्याच्या खासदार पत्नीला तुम्ही जेलमध्ये टाकलं. पत्रकार अर्णब गोस्वामी, राहुल कुलकर्णी यांना जेलमध्ये टाकले. गिरीश महाजन यांचा कार्यक्रम जवळपास झाला होता. आमच्या सरसकट चौकशा लावण्याचे काम झाले. त्यावेळी कोणती मस्ती होती?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महापुरुषांचा अपमान केला म्हणून तुम्ही आमच्यावर टीका केली. मात्र शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे कोणी मागितले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र तुम्ही लावू शकले नाही. मात्र, आम्ही ते लावले. बाळासाहेब ठाकरे यांचेही तैलचित्र लावण्याचं काम आम्ही केलं, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा