गुरु-शिष्यांच्या सहा ग्रंथांचे झाले एकत्र प्रकाशन

0

साहित्‍य संमेलनात पार पडला ऐतिहासिक सोहळा

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचावर गुरु-शिष्‍यांच्‍या एकुण सहा ग्रंथांच्‍या प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यात सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे ह्यांच्या दोन पुस्तकांसमवेत त्यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या तीन विद्यार्थ्यांचे प्रबंध प्रकाशित करण्‍यात आले.

सुप्रसिद्ध समीक्षक आणि विचारवंत डॉ. सुधीर रसाळ आणि सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी ह्यांच्या हस्ते एकाचवेळी प्रकाशित झालेल्‍या या पुस्तकांमध्ये राजेंद्र नाईकवाडे यांची ‘शब्दनिष्ठांची मांदियाळी’ व ‘सासणे यांचे अध्यक्षीय भाषण: चिंतन आणि चिकित्सा’ (संपादित)(लाखे प्रकाशन, नागपूर) ही दोन पुस्तके तसेच, डॉ. मिलिंद चोपकर, रामटेक यांचे ‘मराठी वनसाहित्य : आस्वादाची अक्षरे’(विजय प्रकाशन, नागपूर) हा महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथ, डॉ. माया पराते-रंभाळे, वर्धा यांची ‘संत कवयित्रींची भावकविता’ व ‘मोहोर(काव्यसंग्रह)’(विजय प्रकाशन, नागपूर) ही दोन पुस्तके आणि डॉ. दिनेश खुरगे यांचे ‘ग्रामीण कविता आणि लोकतत्त्वे’(लाखे प्रकाशन, नागपूर) या एकूण सहा पुस्तकांचा त्‍यात समावेश आहे. मिलिंद जोशी गुरू शिष्‍यांच्‍या एकत्र प्रकाशन सोहळ्याचे कौतूक केले व साहित्‍य संमेलनाच्‍या मंचावर असा सोहळा पहिल्‍यांदाच होत असल्‍याचे सांगितले. या कार्यक्रमात प्रकाशक चंद्रकांत लाखे व प्रकाशन मंचचे समन्‍वयक राजेंद्र मुंढे यांची उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित होणारी ही सर्व पुस्तके साहित्यरसिकांना विजय प्रकाशन आणि लाखे प्रकाशन यांच्या ग्रंथविक्री दालनात सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा