पंकजा मुंडेंच्या गाडीत लहानग्या मुली; पंकजा मुंडे यांनी पुरविला गाडीत बसण्याचा हट्ट

0

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गाडीत बसण्याचा लहान मुलींचा हट्ट त्यांनी स्वतः पुरविला आहे. पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत कौठळी आणि कौठळी तांडा पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला जाण्याआधी काही लहानगे त्यांची वाट पाहत रस्त्यात उभे होते. यातील काहींनी त्यांच्या गाडीत बसण्याचा हट्ट केला. लागलीच पंकजा मुंडे यांनी या लहान मुलींना आपल्या गाडीत बसवले आणि कार्यक्रम स्थळी नेले. दरम्यान, आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल देखील होत आहे. गाडीत बसल्याचा आनंद या लहानग्या मुलींनी घेतला. तर त्यांनी पंकजा मुंडेंच्या नावाने घोषणाबाजी केली.
——-

महाबीजच्या वतीने बांधावर जाऊन जनजागृती, शेतकऱ्यांना केले जात आहे मार्गदर्शन

चोपडा : तालुक्यातील अकुलखेडा शिवारात शेताच्या बांधावर महाबीज आपल्या दारी अंतर्गत पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. अकुलखेडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी यांच्या शेतात पिक प्रात्यक्षिक व ग्राम बीजोत्पादन अंतर्गत प्रशिक्षणाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना नवीन वाण जैविक खतं, जैविक बुरशीनाशक याबद्दल महाबीजच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेताच्या बांधावर जाऊन ज्वारीच्या पिकाची पीक पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाची व महाबीजची योजना व त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी घ्यायच्या लाभ यासंदर्भात सविस्तर माहिती ही या ठिकाणी देण्यात आली. या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे कदम मॅडम सुरज ठाकरे, जिल्हा बिज प्रमाणीकरण अधिकारी पी. बी. देसाई, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, कृषी क्षेत्र अधिकारी मोहिनी जाधव यांच्यासह प्रगतशील शेतकरी डॉक्टर रवींद्र निकम, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन यांच्यासह पंचकोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.