चीन शांतताप्रिय देश, राहुल गांधींचा केंब्रीजमध्ये दावा

0

लंडनः चीन हा शांतताप्रिय देश असल्याचा दावा करीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी चीनची प्रशंसा केली आहे. चीनमधील रेल्वे, विमानतळ या पायाभूत सुविधा निसर्गाशी संलग्न असून चीन हा निसर्गाशी अधिक जुळलेला आहे, असेही ते म्हणाले. चीनची प्रशंसा करताना राहुल गांधी यांनी अमेरिकेवर टीका केली. अमेरिकेवरील 9/11 हल्ल्यानंतर तेथे बाहेरील लोकांच्या नोकऱ्या कमी झाल्या. तर चीनच्या साम्यवादी पक्षाने सद्भावना वाढविण्याचेच काम केले, असा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीर हे तथाकथित हिंसक ठिकाण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेतला असून राहुल गांधी हे देशाला बदनाम करण्याचे प्रयत्न करीत असल्याची टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी यापूर्वी बोलताना आपल्या फोनची हेरगिरी करण्यात आल्याचा आरोपही केला होता. बहुतांश राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस सॉफ्टवेअर असल्याचा त्यांचा दावा आहे. गुप्तहेर अधिकाऱ्यांनी मला बोलावून तुमचा फोन रेकॉर्ड होत असल्याचा सावधगिरीचा इशारा दिला होता, असा दावाही राहुल गांधी यांनी केलाय. भारतात विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. माझ्याविरोधातही अनेक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत. यातील अनेक गुन्हे चुकीच्या कारणांसाठी दाखल करण्यात आलेत. देशातील मीडिया व लोकशाही व्यवस्थेवर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर विरोधक म्हणून तुमच्यासाठी बोलणे अवघड होते, असा दावाही राहुल गांधी यांनी केलाय. लोकशाहीसाठी आवश्यक असलेली संसद, स्वतंत्र प्रेस, न्यायपालिका या सर्वच संरचना हतबल झाल्या आहेत, असा दावाही त्यांनी केलाय

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा