छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्याच्या निर्णयाचा एमआयएमकडून विरोध होत असून या निर्णयाच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे शनिवारी दुपारपासून उपोषण सुरु करणार आहेत तर दुसरीकडे मनसेने नामांतराच्या समर्थनात स्वाक्षरी मोहिम सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. एमआयएमच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषण सुरु केले जाणार आहे. (MIM Protest on Renaming of Aurangabad & Osmanabad) त्यामुळे आगामी काळात नामांतरावरून राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अलिकडेच केंद्र सरकारने राज्य सरकारच्या नामांतराच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याने अधिकृतरित्या या दोन्ही शहरांचे नामांतर झाले आहे.
नामांतराच्या निर्णयाला एमआयएमने विरोध केल्यावर मनसेकडून जलील यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जलील रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असतील, तर आम्ही देखील आंदोलन करुन उत्तर देऊ, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिला आहे. दरम्यान जलील यांनी उपोषणाची घोषणा करताच मनसेकडून देखील स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहरातील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोहिमेला शनिवारीच सुरुवात केली जाणार आहे. एमआयएमचे उपोषण आंदोलन शनिवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद नामांतर कृती विरोधी समितीच्या अंतर्गत हे उपोषण आंदोलन होणार आहे. या दोन्ही आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.
नामांतराचे समर्थन व विरोधासाठी एमआयएम, मनसेचे आंदोलन
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा