
दिव्यांगांना व्यंगविरहित करण्याकरिता घेतला गेला पुढाकार
डॉ. दंदे फाउंडेशन, सुश्रृत इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि मातृ सेवा संघाच्या ‘तारांगण’चा संयुक्त प्रयत्न
नागपूर
दि. २८ मार्च २६
नागपुरात आज दिव्यांग मुला-मुलींच्या चेह-यावर हसू फुलले, आणि दिव्यांग मुलांच्या पालकांच्या ह्रदयातील आशा प्रफुल्लित झाल्या. निमित्त ठरले डॉ. दंदे फाउंडेशन, सुश्रृत इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि मातृ सेवा संघाच्या ‘तारांगण’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पेशली एबल्ड श्रेणीतल्या मुला-मुलींकरिता आयोजित सर्जिकल करेक्शन शिबिर.
विविध कारणांमुळे व्यंग घेऊन जन्म झाल्यानंतर पुढील आयुष्यात व्यंग बरेचदा अडचणीचं ठरतं. अनेकदा कुचेष्टेचा विषयही ठरतं. अशा वेळी या व्यंगावर ‘करेक्टीव’ सर्जरी गरजेची ठरते. विशेषत: आर्थिक हतबलता आणि वैद्यकिय सल्ल्याचा अभाव, यामळेही दिव्यांगांच्या वाट्याला अवहेलना येते. यावर मात करण्याकरिता मातृ सेवा संघाच्या ‘तारांगण’ चमूने अश्या दिव्यांगांना यथाशक्य शोधून काढले. डॉ. दंदे फाउंडेशन आणि सुश्रृत इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस या दोन्ही संस्थांनी करेक्टीव सर्जरीचा सगळा खर्च उचलत सुमारे २५ शस्त्रक्रिया नि:शुल्क पार पाडल्या. आज सकाळी ६ वाजल्यापासून शस्त्रक्रिया शिबिराला सुरुवात झाली. दिवसभरात सुमारे २५ दिव्यांगांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या शिबिरात डॉ पिनाक दंदे यांच्या नेतृत्वात डॉ. सीमा दंदे, डॉ. सुशांत मुळे, आणि डॉ दंदे हॉस्पिटलच्या नर्सिंग चमुतील गीता माने आणि डॉ. सुश्रृत बाभूळकर यांच्या नेतृत्वात डॉ. अमोल पाटील, डॉ. श्रीशैल शहाणे, डॉ. सुवर्णा विघ्ने, डॉ. रिता वहाणे, डॉ. चौरे, डॉ. ठाकूर, डॉ लविना, संगीता सिस्टर आणि आकाश ब्रदर यांनी आपली सेवा दिली. भूलतग्य डॉ. गिरीश ठाकरे, मातृ सेवा संघाच्या तारांगण उपक्रमाच्या प्रमुख डॉ. मृणाली देशमुख आणि फिजिओ तग्य डॉ. सारा अंबादे यांनी शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहुन वैद्यकिय सेवा दिली.
डॉ. पिनाक दंदे म्हणाले, की, दिव्यांगांना पूर्णार्थानं आयुष्य जगता यावं, याकरिता सर्जिकल करेक्टीव ऑपरेशन्स महत्वाची भूमिका निभावतात. यामुळे दिव्यांगांचं व्यंग पूर्णपणे निकालात निघतं आणि त्यांना मूळ प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळते. डॉ. दंदे यांनी असेही आवाहन केले, की, सर्जिकल करेक्शन ऑपरेशन्सची गरज असणा-या दिव्यांगांनी मातृ सेवा संघ – तारांगण संस्थेशी संपर्क करावा. या दिव्यांगांवर उपचार करण्याची जबाबदारी डॉ. दंदे फाउंडेशन आणि सुश्रृत इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस संयुक्तपणे उचलेल.
डॉ. सुश्रृत बाभूळकर म्हणाले, सर्जिकल करेक्टीव ऑपरेशन्स झाल्यानंतर जेव्हा दिव्यांग अव्यंग होऊन कोणत्याही न्यूनगंडाशिवाय समाजात सहज वावरताना दिसतो, हे बघताना रुग्णसेवेची कृतकृत्यता अनुभवायला मिळते. ‘तारांगण’च्या डॉ. मृणाली देशमुख म्हणाल्या, की सर्जिकल करेक्शन ऑपरेशन्सच्या माध्यमातून शेवटचा दिव्यांग अव्यंग होईपर्यंत प्रयत्नरत राहणं, हेच या शिबिराचे आयोजक असलेल्या सामाजिक संस्थांचं ध्येय आहे. सर्वश्रीमती व्हिक्टोरिया सोनी, विभा देशपांडे आणि विशाखा बागडे यांनी शिबिराच्या यशस्वितेकरिता प्रयत्न केले.















